ठाणे : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपाची घोषणा करत जनता दरबार आयोजित केल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या मित्रपक्षात वादाच्या ठिणग्या उडू लागल्या असतानाच, शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांनी शहरात पक्षाचे मेळावे घेऊन आपली ताकद दाखविण्यास सुरूवात केली आहे. अशाचप्रकारे बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात एक बैठक घेऊन त्यात ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून यामुळे पालिका निवडणुकीच्या चर्चेने शहरात पुन्हा जोर धरला आहे.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत तीन वर्षांपुर्वी संपुष्टात आली. तेव्हापासून पालिकेची निवडणुक झालेली नाही. यामुळे ठाणे महापालिकेचा कारभार प्रशासनामार्फत चालविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पालिकेच्या निवडणुका होतील अशी चर्चा आहे. परंतु फेब्रुवारी महिना संपत आला तरी निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. आता एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होतील असे अंदाज वर्तविले जात असतानाच, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात भाजपच्या नेत्यांनी नुकतेच सदस्य नोंदणी अभियान राबविले. त्यापाठोपाठ भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपाची घोषणा करत जनता दरबार आयोजित केला आहे. तर, भाजपची ताकद असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा नुकताच मेळावा घेतला.
यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या मित्रपक्षात वादाच्या ठिणग्या उडू लागल्याचे चित्र आहे. असे असतानाच, शिवसेना (शिंदे गट) पक्षाने ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली असून त्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.
दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश मुंबईतील मेळाव्यात बोलताना दिले होते. त्यापाठोपाठ ठाण्यातही असाच संदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ठाणे येथील तीन हात नाका भागातील दादोजी कोंडदेव ॲम्पी थिएटर येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी महत्वपुर्ण बैठक पार पडली.
पक्षाचे खासदार नरेश म्हस्के, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे, शहर प्रमुख राम रेपाळे, एकनाथ भोईर, रमाकांत मढवी, मनोज शिंदे, रमेश वैती, अशोक वैती यांच्यासह प्रमुख नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे, अशा सुचना नेत्यांनी दिल्या. तसेच ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश नेत्यांनी दिल्याने शहरात पालिका निवडणुकीची चर्चा जोर धरू लागली आहे.