ठाणे : शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला आघाडीच्या वतीने ठाण्यात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ५० हजार महिलांचा सामावेश असलेल्या या कार्यक्रमासाठी केवळ ७० हजार रुपये खर्चाचे विवरणपत्र सादर करण्यात आले असून शिवसेनेने निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जेया यांनी केला आहे. हे आरोप खोडसाळपणे करण्यात येत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांच्याकडून असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा करत शिवसेनेने आरोप फेटाळले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हायलँड मैदानात रविवारी शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी सखी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. सखी महोत्सवात ५० हजार महिला उपस्थित होत्या असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता. लोकसभेची आचारसंहिता लागू असल्याने पक्षाच्या कार्यक्रमाच्या खर्चाचे विवरण सादर करावे लागते. या कार्यक्रमात शिवसेनेकडून खर्चाचे विवरण सादर करताना निवडणूक आयोगाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जेया यांनी केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण, डोंबिवलीत उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी, प्रवासी हैराण

५० हजार महिलांचा समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सखी कार्यक्रमासाठी ६९ हजार ६५० रूपये खर्चाचे विवरण पत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये २० बाय ३०च्या व्यासपीठ आणि खुर्च्यांसाठी १५ हजार रुपये, कमान एक हजार रुपये, १५ टेबलसाठी ७५० रुपये, सोफे तसेच इतर खुर्चीसाठी २ हजार ३०० रुपये, फलकांसाठी २४ हजार, डिजीटल फलकासाठी पाच हजार, जनरेटर १० हजार रुपये आणि इतर खर्च असे विवरण देण्यात आले आहे. याबाबत जेया यांनी सांगितले की, एवढे मोठे व्यासपीठ उभारणी, जनरेटर आदी खर्च प्रचंड असूनही कमी खर्च दाखवून शिवसेनेने निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिंंदे यांच्या शिवसेनेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शिवसेनेच्या सखी महोत्सवाची गर्दी डोळे दिपविणारी होती. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांची गरज विरोधकांना लागत आहे. संबंधित विवरणपत्र हे कार्यक्रम होण्यापूर्वीचे आहे. त्यामुळे अंदाजित खर्च देण्यात आला होता. लवकरच नवे विवरणपत्र सादर केले जाणार आहे. – मिनाक्षी शिंदे, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख. शिवसेना.