ठाणे : आपसात भांडणे लावून संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते पण, त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना राज्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांपासून आणि हिंदुत्वापासून दूर ठेवण्याचे काम राऊत यांनी केले, असा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा >>> भाजपाच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच, बावनकुळे यांच्या समोर कार्यकर्त्यांची मन की बात
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुर्वनियोजित दौरा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक घेऊन २२ जागांचा आढावा घेतला, त्याचा या दौऱ्याशी काहीही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका जिकणे, हाच सर्वांचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ४८ लोकसभा जागा महायुती एकत्रितपणे लढणार आणि जिंकणार असा दावाही त्यांनी केला आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा पतंप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिंकायच्या आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले. यामुळेच प्रत्येक पक्षाचा नेता राज्यभर फिरून काम करत आहे. तिन्ही पक्षात कोणतीही नाराजी नाही, युतीमुळे काही फायदे तर काही तोटे आहेत, पण, त्यावर वरिष्ठ तोडगा काढतात, असेही म्हस्के म्हणाले. उशिरा का होईना राजन विचारे यांच्यावर विश्वास ठेवला गेला, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा >>> ठाणे, डोंबिवलीत मनसेची चहूबाजूंनी कोंडी
आपसात भांडणे लावून संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते पण, त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. राऊत यांनी नगरसेवकाची निवडणूक लढून जिंकून दाखवावी. आमदारामुळे राऊत हे निवडून आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा होता, तेव्हा राऊत आपली भूमिका काय होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर तुम्ही उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या बद्दल काय बोललात ते सांगा, तुमची त्यावेळची तुमची भूमिका काय होती ती सर्वांना कळू दया. कुलदैवताची शपथ घेऊन सांगा हे खोटे होत नाहीतर काही दिवसांत आम्ही सर्व लोकांसमोर आणू, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
त्या ठिकाणी भंगार मनोवृत्तीची भाडोत्री माणस जाणार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवर हिंदुत्वाचे विचार द्यायचे त्यामुळे त्याला शिवतीर्थ म्हटले जायचे. परंतू त्या ठिकाणी आज भंगार मनोवृत्तीचे विचार सांगितले जाणार आहेत. त्या ठिकाणी भंगार मनोवृत्तीची भाडोत्री माणस जाणार आहेत. तर आमच्याकडे हिंदुत्वाच्या विचारांचे अंगार असणारी सच्चे शिवसैनिक जाणार आहेत. त्यामुळे जागा महत्त्वाची नाही विचार महत्त्वाचे आहेत असा टोला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हसके यांनी लगावला. आज, मंगळवारी ठाण्यामध्ये दसरा मेळावा आणि शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्याच बरोबर नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुका याबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, संपर्क प्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी, नेते, उपनेते यांची बैठक, मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले.