ठाणे : तुम्ही काचेच्या घरात राहत असल्यामुळे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरताना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. तसेच मातोश्री आणि खोके हे वेगळे आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत आदित्य यांच्यावर गंभीर आरोप केले. मातोश्रीवर चंदू आणि नंदू कोण आहेत, हे आम्हाला सांगायला लावू नका आणि मातोश्रीवर कोण पैसे गोळा करत होते आणि कोणी किती खोके दिलेत, याची माहितीही आमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतील जांबोरी मैदानात रविवारी जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती. या टिकेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. चार ते पाच वर्षे तुमचे ब्रँडींग करण्यासाठी आणि तुमच्या मित्रांच्या कंपन्या यावर करोडो रुपये खर्च केले. जाहीर सभा, संवाद यात्रा, आदित्य संवाद यासाठी वातानुकूलित सभागृह तयार केले. तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी सुशिक्षित माणसे पैसे देऊन आणलीत. हे सगळे इव्हेंट साजरे केले. त्यासाठी खर्च लागतो. तो कुठून आणला. कोणत्या खात्यातून तो खर्च दाखवला. तुमचे परदेश दौरे, रात्रीच्या उद्योगाबाबत बोलत नाही, ते जाऊ द्या, अशी टीका म्हस्के यांनी केली.
आम्ही जर तोंड उघडले तर, तुम्हाला पळता भुई थोडी होईल. दौऱ्यांसाठी खर्च कशातून केला. तुमच्या कोणत्या कंपन्या आहेत आणि तुमचा कोणता व्यवसाय आहे. या सगळ्या गोष्टी हवेतून निर्माण झाल्या का, तुम्ही मुंबई महापालिकेत एक प्रकल्प घेतला होता. हवेतील बाष्पापासून पाणी निर्माण करण्याचा. तसे तुम्ही हवेतून पैसे काढले का. मुंबई महापालिकेतून जो गडगंज पैसे आणि खोके जमा केले आहेत. त्यातूनच या सर्व गोष्टी केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या वास्तूचा प्रत्येक दगड आणि भिंती तुम्हाला विचारत आहे की, कुठे नेऊन ठेवला मुंबई महापालिकेचा पैसा, अशी टीकाही म्हस्के यांनी यावेळी केली. काळ्याचे पांढरे करण्यासाठी कोणत्या परदेशी आणि देशी कंपन्या आहेत, याची माहिती अनेकजण आम्हाला देत आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – ठाण्याच्या स्थावर मालमत्ता विभागातून महेश आहेर यांना हटवले
भास्कर जाधव हे राष्ट्रवादी पक्षात गेल्यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहत होते. तिथे मंत्रिपद मिळाले नाही म्हणून शिवसेनेत पुन्हा आले. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले होते, तेव्हा त्यांनी गद्दारीच केली होती. जाधव हे ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्यावर टीका करतात, ते केवळ मातोश्रीवर विश्वास दाखविण्यासाठीच. हा माणूस आमच्या पक्षात येण्यासाठी आमच्याशी चर्चा करीत असून हा नौटंकी माणूस आहे, अशी टीका म्हस्के यांनी केली. आम्ही तुमची प्रकरणे बाहेर काढली तर, दुसऱ्यादिवशी जेलमध्ये जाल. त्यामुळे आरोप करायचा प्रयत्न करू नका, असा इशाराही म्हस्के यांनी यावेळी दिला.