ठाणे: शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांच्यावर मंगळवारी रात्री जांभळी नाका येथे धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
जांभळीनाका ही बाजारपेठ ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ ओळखली जाते. या बाजारपेठेत शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांचा व्यवसाय होता. काही दिवसांपासून त्यांचे दुकानाच्या कारणावरून दोन फेरीवाल्यांसोबत वाद झाले होते. मंगळवारी रात्री १० वाजता परदेशी हे रात्री घरी जात असताना दोन ते तीन जणांनी त्याच्यांवर धारदार चाकूने हल्ला केला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
हेही वाचा – ठाणे : दुचाकी आणि सोनसाखळी चोर अटकेत
हेही वाचा – ठाणे : साहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण चारही आरोपींना जामीन
घटनेची माहिती मिळताच ठाणेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, ठाण्यात फेरीवाल्यांच्या वादातून यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. या हत्येनंतर फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.