महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कल्याण डोंबिवलीतील ताकद वाढविण्यासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आज (शनिवार) कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने ‘आता कसं वाटतय बरं बरं वाटतय… कारण पेराल तेच उगवणार’ अशा आशयाचे फलक लावून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यामुळे पडलेली उभी फूट या पार्श्वभूमीवर हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत.
आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि यापुढील काळातील पक्षाची व्यूहरचना याविषयी चर्चा करण्यासाठी युवा नेते अमित ठाकरे आज कल्याण डोंबिवलीत दाखल झाले. खडकपाडा येथील स्प्रींग टाईन हॉटेलमध्ये त्यांच्या बैठका होत आहेत. सकाळी ते कल्याणमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून दुपारी डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन्ही शहरात भरगच्च कार्यक्रम –
अमित यांच्या दौऱ्यामुळे मनसेचे शहरातील सर्व कार्यालये खुली ठेवण्यात आली आहेत. मनसेची कल्याण डोंबिवलीतील ताकद मोठी आहे आणि हे आम्ही आमच्या शक्तिप्रदर्शनातून दाखवून देतो, असे आमदार प्रमोद पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे युवा नेत्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शहरात भरगच्च कार्यक्रम मनसेने आयोजित केले आहेत. बैठकीत काय चाललय यापेक्षा मनसेने शिवसेनेला डिवचणारे फलक लावल्याने तोच शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
… म्हणून अमित ठाकरेंचा दौरा विशेष महत्वाचा –
या बैठक सत्रांमध्ये तरुण वर्गाला मनसेकडे आकर्षित करण्यासाठी विद्यार्थी, त्यांच्या शैक्षणिक समस्या याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आदेश युवा नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बैठकीच्यावेळी दिले. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सोप्या गोष्टी पण कठीण होऊन बसल्या आहेत या विषयावर मनसेकडून आवाज उठविला जाणार आहे, असे पदाधिकाऱ्याने सांगितले. शिवसेनेतील बंडखोरीनंतर कल्याण डोंबिवलीत ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेनेची विभागणी झाली आहे. या दोन्ही गटातील अस्वस्थता हेरून मनसेच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे.