अंबरनाथः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अंबरनाथ शहरातून दोन टप्प्यांत त्यांना पाठिंबा मिळाला. अंबरनाथ शहरात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाल्याने शिवसेनेचा (उबाठा गट) सुपडा साफ झाल्याची चर्चा होती. मात्र शिवसेनाच्या (उबाठा) शहर कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. शहरप्रमुखांसह इतर पदे बहाल करण्यात आली आहेत. दुसरीकडे शिवसेनेची कार्यकारिणी मात्र प्रतिक्षेत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात संजय सावंत यांच्याकडे शहर प्रमुख (पूर्व) तर संदीप पगारे यांच्याकडे पश्चिमेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी शहर प्रमुख सुभाष घोणे यांच्यावर शहर संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून माजी उपशहर प्रमुख निशिकांत उर्फ बाळा राऊत यांच्याकडे शहर समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांना अंबरनाथ शहरातून सुरुवातीला स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि त्यांच्या समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पाठिंबा मिळाला. त्यानंतर ठाकरे गटाने शहरप्रमुखांची नियुक्ती केली होती. काही महिन्यांनी शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर ठाकरे गटाचे शहरप्रमुख शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे अंबरनाथ शहरात ठाकरे गट संपल्याची चर्चा होती. पहिल्या फळीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते शिवसेनेत गेले होते. दोन महिन्यांनंतर आता पुन्हा ठाकरे गटाने आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात दुसऱ्या फळीतील आणि काही जुन्या शिवसैनिकांचा समावेश आहे. शहर संघटक, शहर समन्वयक, सचिव, शाखाप्रमुखांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेची कार्यकारिणी प्रलंबित
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बंडानंतर दुसऱ्यांदा कार्यकारिणी जाहीर झाली असली तरी मुळ शिवसेनेची अद्याप एकदाही कार्यकारिणी जाहीर झालेली नाही. शहरप्रमुख पदावर कुणाची वर्णी लावायची याबाबत अद्याप निर्णय झाला नाही.