ठाणे : टेंभीनाका येथील देवीच्या मंडपातील पंखे, वातानुकूलीत यंत्रणा आणि ध्वनी क्षेपक यंत्रे आज सुरू असून इथे कोणी कुणाचा आवाज दाबू शकत नाही, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला लगावला. देवीचा दरबार हा कोणाच्या मालकीचा नाही, असे सांगत देवीच्या दरबारात जर कोणी चुकीचे वागत असेल तर त्याचा देवी वध केल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी दिली.
हेही वाचा >>> रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला, मंडपातील एसी-पंखे बंद? ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा संताप
टेंभीनाका येथील देवीच्या दर्शनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना दिलेल्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर हि प्रतिक्रिया दिली. गुरुवारी पंचमीच्या दिवशी खासदार राजन विचारे यांनी कुटुंबासोबत टेंभीनाका येथील देवीची पूजा आणि आरती केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या मंगळवारी टेंभीनाका येथे देवी दर्शनासाठी आल्या होत्या, त्यादरम्यान पंखा, वातानुकूलीत यंत्रणा आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद ठेवण्यात आल्याचा आरोप महिला आघाडीने केला होता. याच संदर्भात पत्रकारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांना प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिंदे गटावर टिका केली. आज पंखा, कुलर, वातानुकूलीत यंत्रणा सुरू आहे.
हेही वाचा >>> बदलापुरातील दिव्यांनी उजळणार परदेशातील दिवाळी; ‘या’ आखाती देशात लाखो पणत्या रवाना
ध्वनीक्षेपक पण सुरू आहे. कोणाचा आवाज दाबता येऊ शकत नाही. हा देवीचा दरबार आहे. कोणाच्या मालकीचा दरबार नाही, असे त्यांनी सांगितले. देवीच्या दरबारात जर कोणी चुकीचे वागत असेल तर देवी त्याचा वध केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले. देशात राक्षसी प्रवृत्ती फोफावत चालली आहे, माणुसकी राहिलेली नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात आहे, अशी टिकाही त्यांनी केली. देवी जे देईल त्यात समाधान मानायचे असते. परंतु एखाद्याचे समाधान होत नसेल तर त्याला काहीही करू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.