कल्याण- कल्याण पूर्वेत काटेमानिवलीमध्ये एका तरूणीने सात मुलांच्या छळाला कंटाळुन गेल्या आठवड्यात आत्महत्या केली आहे. या तरूणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेल्या आठवड्यापासून समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या ध्वनीचित्रफिती, लघुसंदेश पाठविणाऱ्या कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या उपशहर संघटक आशा ऋतुकांचन रसाळ आणि त्यांच्या पतीला आठ जणांनी शिवीगाळ तसेच धमकी देऊन पाठलाग करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मयत तरूणीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींमध्ये काही धनदांडग्यांची मुले सहभागी आहेत. त्या प्रकारातून ही घटना घडली असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या कल्याण पूर्व उपशहर संघटक आशा रसाळ शनिवारी रात्री पती ऋतुकांचन यांच्यासह भोजन करण्यासाठी कल्याण-पडघा रस्त्यावरील बापगाव येथील ग्रीन स्पाईस हाॅटेलमध्ये गेल्या होत्या. त्यावेळेस तिथे असलेल्या आठ जणांच्या गटातील एकाने आशा यांना शिवीगाळ केली. कल्याण पूर्वेतील मयत तरूणीच्या घटनेत तू खूप चित्रफिती करतेस, फेसबुकवर खूप उड्या मारतेस असे म्हणत त्याने त्यांना शिवीगाळ सुरू केली. मी नरेंद्र पवार यांचा भाऊ आहे असे म्हणत त्याने आशा यांच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे त्या हाॅटेलच्या प्रवेशद्वारावर जाऊन थांबल्या. पत्नी बाहेर का गेली म्हणून ऋतुकांचन तेथे आले.

त्याचवेळेस ते आठजण भोजन सोडून प्रवेशद्वारावर आले. त्यांनी आशा, त्यांच्या पतीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. आशा या रिक्षा पकडून घरी निघाल्या असता, त्या आठ जणांनी त्यांच्या रिक्षाचा मोटार, दुचाकीने पाठलाग केला. गांधारी पूल निक्कीनगर येथे रिक्षा अडवून त्यांनी त्या दोघांना बाहेर खेचून लाथाबुक्क्यांनी पुन्हा मारहाण केली. ही मारहाण करण्यांमध्ये सचिन पाटील नावाचा व्यक्ती होता. त्याने समोरील व्यक्तिला मी यांना एकटा पुरेसा आहे असे सांगितले, असे आशा यांनी तक्रारीत म्हटले आहे. दोघांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतले. या प्रकरणी आशा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात आशा गुन्हा दखल करण्यात आला आहे.

या संदर्भात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आपला कोणताही नातेवाईक तेथे नव्हता. एक भाऊ पालिकेत साहाय्यक आयुक्त तर दुसरा पुणे येथे आहे. हेतुपरस्सर आपल्या नावाचा तेथे उल्लेख करण्यात आला असावा. अशाप्रकारे महिलेला रात्रीच्या वेळेत मारहाण करणे चुकीचे आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पोक्सोचा गुन्हा

तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित (पोक्सो) कायद्याने नवीन गुन्हा दाखल केला. सामुहिक बलात्कार, पोक्सोची कलमे टाकण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजप नेत्या चित्रा वाघ, इतर महिला संघटनांनी केली होती. या मुलीच्या समर्थनार्थ रविवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर रहिवाशांनी मोर्चा काढला होता. सोमवारी आठ आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.