लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी ‘नमो सैनिक’ म्हणून काम करण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले असून त्याचबरोबर महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘नमो सैनिक’ म्हणून काम करावे, असे आवाहन शिंदेंच्या शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी केले आहे. यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने ‘नमो सैनिक’ चा नारा दिल्याची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी(अजीत पवार गट) या तिन्ही पक्षांची महायुती विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांची महाआघाडी असा सामना रंगणार आहे. परंतु लोकसभेच्या जागेवरून महायुती आणि महाआघाडीच्या मित्र पक्षांमध्ये चढाओढीचे राजकारण सुरू असून त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. असे असतानाच, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने ‘नमो सैनिक’चा नारा दिला आहे.

आणखी वाचा-शिवसेना-भाजपमधील समन्वयाच्या अभावामुळे गोळीबाराची घटना, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची माहिती

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा निवडूण आणण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. हा शब्द पुर्ण करण्यासाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेची, हि जागा राष्ट्रवादीची, ही जागा भाजपची, असा वाद महायुतीमधील कार्यकर्त्यांनी करू नये. सर्वांनी ‘नमो सैनिक’ म्हणून काम करावे. ‘नमो सैनिक’ म्हणून काम करण्याचे निर्देश शिवसैनिकांना दिले आहेत, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले. त्याचबरोबर महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘नमो सैनिक’ म्हणून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Story img Loader