भगवान मंडलिक
ठाणे जिल्ह्य़ातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी भाजपने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्याच्या निमित्ताने भाजपने हे अधोरेखित केले. मोदी लाटेत मिळालेले यश कायम राहावे म्हणून विकासकामांवर भर देण्यात आला असून, भिवंडी आणि कल्याण मेट्रोच्या माध्यमातून मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाणे जिल्ह्य़ात लोकसभेचे चार मतदारसंघ असून, ठाणे आणि कल्याण शिवसेनेकडे तर भिवंडी व पालघर हे भाजपकडे आहेत. गेल्या मे महिन्यात झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत अटीतटीचा सामना झाला होता आणि त्यात भाजपने शिवसेनेचा पराभव केला असला तरी शिवसेनेने भाजपचा पुरता घाम काढला होता. जिल्ह्य़ातील चारही मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजप आणि शिवसेनेची युती होते का, हा खरा प्रश्न आहे. युती न झाल्यास भिवंडी आणि पालघर मतदारसंघ कायम राखण्याचे भाजपपुढे तर ठाणे व कल्याण मतदारसंघ कायम राखण्याचे शिवसेनेपुढे आव्हान असेल.
ठाणे जिल्ह्य़ाच्या विविध भागात पुंजक्याने असलेल्या पक्षाला विस्तीर्ण रूप देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने मागील काही वर्षांपासून सुरू केला आहे. १९९६च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने हिरावून घेतला ही सल भाजप नेत्यांच्या मनात अजूनही आहे. यातूनच शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. पालघर पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत काटय़ाची टक्कर झाली. शिवसेनेने सारी ताकद पणाला लावली होती. पण भाजपने निसटत्या मतांनी हा मतदारसंघ कायम राखला. ठाणे जिल्ह्य़ावरील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मांड मोडणे भाजप धुरीणांना जमले नाही. ही मांड विकासकामांच्या माध्यमातून मोडून जिल्ह्य़ावर भाजपची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील चार वर्षांपासून चालवला आहे.
ही पकड अधिक घट्ट करण्यासाठीच भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्याणमध्ये आणले. येणाऱ्या काळात सर्व जात, धर्म-पंथांना आपलेसे करून भाजपचा ठाणे जिल्ह्य़ावर वरचष्मा राहील यावर शिक्कामोर्तब केले. ठाणे-कल्याण, दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो मार्ग, आवास योजनेतील घरांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठाणे येथे मध्यवर्ती ठिकाणी करण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. ठाण्यात पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम घेतला तर त्याचे श्रेय आपसूक शिवसेनेला मिळेल या विचाराने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप आमदार, खासदार असलेल्या विभागात पंतप्रधानांचा कार्यक्रम झाला पाहिजे, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला. तो यशस्वी झाला.
आनंद दिघेंनी रुजवलेली आणि एकनाथ शिंदे यांनी विस्तारलेली सेनेची जिल्ह्य़ातील घडी विस्कटण्याचे प्रयत्न भाजपकडून गेल्या काही वर्षांपासून पद्धतशीरपणे सुरू आहेत. मागील चार वर्षांत मुख्यमंत्र्यांनी खासदार कपिल पाटील यांच्या मागणीवरून भिवंडी शहर परिसरासाठी एक हजार कोटीहून अधिकची विकास कामे मंजूर केली. या भागातील गावांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे आदेश ‘एमएमआरडीए’ला दिले आहेत. २७ गावांना नगरपालिका करण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्य़ाचा बहुतांशी भाग आगरी, कोळी, आदिवासीबहुल वस्तीचा आहे. यामधील एकही घटक नाराज होऊ नये, अशी व्यवस्था भाजपने केली आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन मार्गात आगरी समाजाच्या जमिनींचे सर्वाधिक भूसंपादन होणार आहे. या समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने हे भूसंपादन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिले. याच भागातील कोळीवाडय़ांचे स्वतंत्र विकास आराखडे तयार करून महसूल दप्तरी त्यांच्या नोंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भिवंडीतही पायाभरणी
भिवंडीतील वस्त्रोद्योग विचारात घेऊन या भागात ‘लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यात येणार आहे. या व्यवसायात मुस्लीम समाज अधिक आहे. त्यांचा विचार यानिमित्ताने करण्यात आला आहे. रेल्वे मार्गापासून वंचित असलेल्या भिवंडीला मेट्रो मार्गाने जोडून येथील शहरी, ग्रामीण रहिवाशांचा प्रवास सुखकर करण्यावर भर देण्यात आला आहे. भिवंडीत खासदार कपिल पाटील यांचे प्रस्थ असले तरी भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली होती व काँग्रेसला सत्ता मिळाली होती. ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीत विकासाची कोटय़वधीची कामे प्रस्तावित आहेत. मेट्रो मार्गिका डोंबिवलीत नाही म्हणून भाजपचा बालेकिल्ला असलेला डोंबिवलीकर नाराज होऊ नये म्हणून पंतप्रधानांची कार्यक्रम व्यासपीठावर मंजुरी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली ते तळोजा मेट्रो मार्गिकेची घोषणा केली. नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटांसाठी ९० हजार घरांचा गृहनिर्माण प्रकल्प राबवून घरांच्या चढय़ा दराने हवालदिल सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे. पश्चिम उपनगरावर अन्याय नको म्हणून तेथील जनतेला विकासाच्या माध्यमातून आपलेसे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहिसर ते मिरा-भाईंदरचीपर्यंतची मेट्रो ठाकूरांच्या वतनदारीतून वसई-विरापर्यंत नेण्याची घोषणा केली. आदिवासीबहुल ठाणे जिल्ह्य़ाची वारली कला हे एक प्रतीक आहे. वारली कलेची प्रतिमा मुख्यमंत्र्यांनी मोदींना देऊन वारली, आदिवासी समाजाचा सन्मान केला. आतापर्यंत डोंबिवली, कल्याण, ठाणे, पालघर पट्टय़ात पुंजक्याने असलेल्या भाजपला विकासाच्या माध्यमातून मतांमध्ये मोठय़ा प्रमाणात परावर्तित करण्यासाठी मुख्यमंत्री व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आघाडी उघडली आहे. सिडकोची पंतप्रधान आवास योजनेतील घरांची ताबा प्रमाणपत्रे पंतप्रधानांच्या हस्ते देण्यासाठी मुस्लीम, आदिवासी, मराठा, आगरी अशा गटातील प्रातिनिधिक मंडळी निवडण्यात आली होती. सर्व समाजाला विकासाच्या माध्यमातून आपलेसे करून ठाणे जिल्ह्य़ातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेची असलेली सद्दी संपविण्याचा भाजपच्या रणनीतीकारांचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्याणमध्ये आणून मुख्यमंत्र्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही व्यूहरचना करण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामांचे परिवर्तन मतांमध्ये कसे होतेय याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.