बदलापूर : आपण मुंबईपासून अगदी जवळ राहतो. मुंबईच्या धर्तीवर आपण बांधकामे केली पाहिजेत. आज कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण झाले. ते स्मारक पाहा आणि आपले स्मारक पाहा. जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे चाललो आहोत, असे सांगत बदलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी पुन्हा एकदा आमदार किसन कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता कथोरे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा शाब्दीक चकमक रंगण्याची शक्यता आहे.
बदलापूर शहरात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्यात शाब्दिक चकमकी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचा पदाधिकारी फोडल्याने म्हात्रे यांनी कथोरे यांच्या प्रचारापासून अंतर ठेवत त्यांच्यावर वेळोवेळी टीका केली होती. त्याचवेळी मोठ्या अंतर्गत विरोधातही निवडून आल्यानंतर कथोरे यांनी पहिल्याच भाषणात पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधकांना इशारा दिला होता. त्यानंतर किसन कथोरे आणि वामन म्हात्रे संघर्ष धुसमताच आहे. सध्या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवत आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन राबवलेल्या योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करून त्याच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच पालिकेच्या माध्यमातून एकाच कामाचे लहान तुकडे करून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचाही आरोप केला होता. या आरोपांनंतर शहरात पुन्हा एकदा कथोरे विरूद्ध म्हात्रे असा संघर्ष दिसून आला होता.
आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्मारकाचे काम सुरू आहे. पण कल्याण पूर्वेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्मारकात एक ज्ञान केंद्र उभारले आहे. जर वेळ असेल तर त्या स्मारकाला
जाऊन भेट द्या, ते स्मारक आवर्जून बघा असे आवाहन वामन म्हात्रे यांनी कार्यक्रमात बोलताना केले. मी आताच तिकडे जाऊन आलो. तिथे डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला आहे. तिकडे बांधकाम पाहा, असेही आवाहन म्हात्रे यांनी यावेळी बोलताना केला. ते स्मारक पाहा आणि आपले स्मारक पाहा. जग कुठे चालले आहे. आणि आपण कुठे आहोत, असा प्रश्न यावेळी म्हात्रे यांनी उपस्थित केला. आज स्पर्धेचे युग आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहीली पण त्यात काळानुरूप सुधारणा केल्या आहेत. आज आपण आपले बदलापुरातले स्मारक पाहिले की आपण अजून मागे आहोत असे वाटते, असे सांगत म्हात्रे यांनी अप्रत्यक्षरित्या कथोरे यांना टोला लगावला आहे. आपण मुंबईपासून अगदी जवळ आहोत. त्यामुळे शहरातली बांधकामे मुंबईच्या धर्तीवर केले पाहिजे. कल्याणचे स्मारक पाहा आणि तसे करा. जर तुम्हाला जमत नसेल तर स्मारक आमच्या ताब्यात द्या, असे सांगत म्हात्रे यांनी कथोरे आणि त्यांच्या समर्थकांना थेट आव्हान दिले आहे. म्हात्रे यांच्या या वक्तव्यानंतर आता कथोरे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोनिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अनेक वर्षे रखडले होते. आता ते पूर्णत्वास आले असले तरी त्यात अजुनही काम सुरू आहे. त्यावरून म्हात्रे यांनी ही टीका केली आहे.