या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात शिवमंदिर संस्कृतीची शंृखला अनेक शिवमंदिरातून पाहायला मिळते. श्रावण महिना तर शिवमंदिर दर्शनाचा विशेष पर्वकाळ मानला जातो. केवळ श्रद्धा आणि भक्तिभाव नव्हे, तर शिल्पसंस्कृतीचा उत्तम नमुना म्हणून शिवालयांकडे पाहिले जाते. ठाणे-कल्याण परिसरावर पूर्वी शिलाहारी राजांची सत्ता होती. शिवभक्त असलेल्या शिलाहारी राजांनी जागोजागी शिवमंदिरांची निर्मिती केली. अंबरनाथ आणि खिडकाळी येथील प्राचीन शिवमंदिर सर्वानाच ठाऊक आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील अन्य काही शिवमंदिरांचा धांडोळा..

कौपिनेश्वर मंदिर

ठाणे शहराच्या प्राचीनत्वाची खूण सांगणारे मंदिर म्हणजे कौपिनेश्वर मंदिर. मासुंदा तलावाजवळ असलेले या मंदिराची उभारणी १७६०मध्ये झाली. पेशव्यांच्या दरबारी असलेल्या सरसुभेदार रामजी बिवलकर यांनी हे मंदिर बांधले आहे. या मंदिरातील शिवलिंग भव्य आकाराचे आहे. तब्बल तीन फूट उंच आणि १२ फुटांचा गोलाकार घेर असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग असावे. मंदिराच्या सभागृहाला १६ कलात्मक खांब असून खांबाच्या तळाशी कलशाची चित्रकृती कोरण्यात आलेली आहे.

पिंपळेश्वर मंदिर

डोंबिवलीच्या ग्रामीण भागात सागाव येथे असलेले पिंपळेश्वर मंदिर हे डोंबिवलीची शान आहे. तब्बल १५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून २००१मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पाच ते सहा पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन खांब आणि त्यानंतर मंदिराचे सभागृह लागते. मंदिराच्या आजूबाजूच्या मोकळय़ा जागेत फुलझाडे आणि अन्य वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. सध्या या मंदिराच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू आहे.

श्रीगंगा गोरजेश्वर

शहापूर तालुक्यातील आणि टिटवाळय़ापासून जवळच असलेले हे एक रमनीय शिवमंदिर. काळू नदीपात्रात असलेल्या या शिवमंदिरात जाण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागतो. हे मंदिर ५०० वष्रे जुने असावे, असे बोलले जाते. त्याचे बांधकाम प्राचीन हेमाडपंथी शैलीतले. मंदिरातील शिवलिंगही पाण्यात आहे. मंदिर परिसरात विविध देव-देवतांच्या मूर्ती, शिल्प आणि घोटीव शिलालेख या मंदिरातील प्राचीनत्वाची साक्ष देतात. या मंदिरामागे गरम पाण्याची पाच कुंड आहेत.

लोणाडचे शिवमंदिर

अंबरनाथच्या शिवमंदिरानंतरचे हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. शिलाहारी राजांनीच १२व्या शतकात या मंदिराची उभारणी केल्याचा इतिहास आहे. भिवंडीजवळील लोणाड येथे एका टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहे, याच लेण्यांपासून काही किलोमीटर अंतरावर हे शिवमंदिर आहे. रामेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची मोठय़ा प्रमाणावर वाताहत झालेली आहे. मंदिरातील गाभारा व शिवलिंग चांगल्या स्थितीत आहे, मात्र खांब मोडकळीस आलेले आहेत. मंदिरातील खांबांवर आणि भिंतीवर नक्षीकाम आणि विविध देव-देवतांची शिल्प कोरण्यात आलेली आहेत.

जागनाथ महादेव मंदिर

घोडबंदर रोडवर गायमुख या ठिकाणी नागला बंदराच्या विरुद्ध बाजूला एका हिरव्यागार टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. शंभरेक पायऱ्या चढल्यानंतर या मंदिराचा परिसर लागतो. पांढऱ्याशुभ्र रंगाचे हे संगमरवरी मंदिर अतिशय सुंदर असून, मंदिराच्या समोर भलेमोठे पटांगण आहे. मंदिराची रचना भिंतीविना सभागृह आणि गाभारा अशी आहे. सभागृहाला सहा खांब असून दोन्ही बाजूला लहान मंदिरे आणि मध्यभागी मुख्य मंदिर आहे. मुख्य मंदिरात शिवलिंग असून, बाजूच्या एका मंदिरात शिव-पार्वती आणि दुसऱ्या मंदिरात गणेशाची मूर्ती आहे. आजूबाजूचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.