गर्दी वाढण्याच्या भीतीने भाविकांना बंदी
अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिर यंदाच्या महाशिवरात्रीलाही भाविकांसाठी बंद राहणार आहे. गर्दी आणि संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने यासाठीचा प्रस्ताव मंदिराच्या विश्वस्तांना दिला होता. विश्वस्त मंडळाने पालिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत केवळ विधिवत पूजा करण्याचे मान्य करत महाशिवरात्रीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षांत शिवमंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.
प्राचीन मंदिर असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिरात दर्शनासाठी अनेक शहरांतून दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावत असतात. महाशिवरात्रीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त सर्वात जुनी जत्राही येथे भरत असते. जत्रेसाठी लाखो भाविक, आसपासचे विक्रेते शहरात येत असतात. त्यामुळे शहरात मोठी गर्दी होत असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांत ही जत्रा रद्द करण्यात आली होती. तर मंदिरातही फक्त विधिवत पूजा करण्यात आली होती.
महाशिवरात्रीला भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यंदाच्या वर्षांत राज्य शासनाकडून विविध निर्बंध हटवले जात असल्याने यंदाच्या महाशिवरात्रीला मंदिरात प्रवेशाची संधी मिळेल अशी आशा होती. मात्र, गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने मंदिराच्या विश्वस्तांना यंदाही मंदिर शिवरात्रीच्या दिवशी बंद ठेवण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. त्याला दाद देत मंदिर विश्वस्तांनी यंदाच्या वर्षांतही शिवरात्रीच्या काळात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यंदा मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव असेल. शिवमंदिराकडे जाणारे अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर एक दिवस नाकाबंदी केली जाणार आहे, अशी माहिती अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.
यंदा महाशिवरात्रीला केवळ मंदिरात गाभाऱ्यात फक्त पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा केली जाणार आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश नसेल. – रवी पाटील, विश्वस्त, शिवमंदिर अंबरनाथ.