ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या कमी व्हावी याकरिता गेले महिन्याभरापासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून शिवजल सुराज्य हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत पाच तालुक्यांमध्ये लोकसभागातून १ हजार ५१५ वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी ६१९ वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अभियानाद्वारे ग्रामीण भागाची वाटचाल लवकरच टँकरमुक्तीकडे होईल असा दावा जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची सर्वात मोठी समस्या भेडसावत असते. त्यातही शहापूर आणि मुरबाड तालुक्याला फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात असलेली पाणी टंचाईची समस्या दुर व्हावी याकरिता गेले अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न केले जात आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून शिवजल सुराज्य अभियान राबविण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे. या अभियानात सर्व तालुक्यात १ हजार ५१५ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यापैकी ६१९ वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.
शहापूर आणि मुरबाड तालुक्यात सर्वाधिक काम पूर्ण
जिल्ह्यात मुरबाड आणि शहापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या आहे. या तालुक्यात एकूण ८५ टँकर ग्रस्त गावे आहेत. त्यामुळे यागावात हे अभियान मोठ्याप्रमाणात राबविले जात आहे. मुरबाड तालुक्यात ४१५ तर, शहापूर तालुक्यात ४५० वनराई बंधारे बांधण्याचे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट्ये आहे. त्यापैकी मुरबाड तालुक्या १३२ आणि शहापूर तालुक्यात २१८ वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.
काय आहे शिवजल सुराज्य अभियान ?
गाव परिसरात पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होण्यासाठी ओढ्यातील वाया जाणारे पाणी अडवून वनराई पद्धतीचा बंधारा बांधण्यात येत आहे. सिमेंटच्या किंवा अन्य मोकळ्या गोण्यांमध्ये वाळू भरून हा बंधारा बांधला जात असून बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतालगतच्या परिसरातून ओढा, नाला वाहत असल्याने पावसाळा संपताच पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर ओढ्या, नाल्यावर वनराई बंधारे बांधणे शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. तसेच छतावरील पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी विविध योजनेतुन मंजुर कामे या अभियानातून सुरु करण्यात आली आहेत.
अभियानांतर्गत ही कामे देखील होणार
साखळी सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढणे
साठवण बंधारा दुरुस्ती करणे
पाझर तलाव दुरुस्ती करणे
विहीरी, जलकुंभातील गाळ काढणे
विंधण विहिरीव्दारे छतावरील पाऊस पाणी संकलन
काम पूर्ण झालेल्या बंधारेंची संख्या (तालुकानिहाय्य)
तालुका उद्दिष्ट काम पूर्ण
कल्याण १०० ८१
भिवंडी ४५० १३६
मुरबाड ४१५ १३२
शहापूर ४५० २१८
अंबरनाथ १०० ५२
एकूण १,५१५ ६१९