शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या डोंबिवलीतील शेलार नाका भागात राहत असलेल्या एका कट्टर शिवसैनिकाने मुलीच्या जन्माच्या काही तास अगोदर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वप्नात आल्याने आणि त्यांनी आभासी पद्धतीने ‘तुझ्या घरात शिवसेना येत आहे,’ असे सूचक वक्तव्य केल्याने आपल्या नवजात बाळाचे नाव ‘शिवसेना’ ठेवले. यापुढे ही मुलगी शिवसेना पांडुरंग वाडकर या नावाने ओळखली जाणार आहे.
महाड तालुक्यातील मूळ निवासी असलेले पांडुरंग वाडकर पत्नी, मुलगी संस्कृती हिच्यासह डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका भागात राहतात. पांडुरंग कट्टर शिवसैनिक,शिवसेनाप्रमुखांवर नितांत प्रेम. सात महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी शिवसेनेची विभागणी झाली. तेव्हापासून शिवसैनिक पांडुरंग अस्वस्थ होते. आपण एक सामान्य शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने चालायचे असा विचार करून पांडुरंग यांचे पक्षीय काम सुरू होते. या कालावधीत पांडुरंग यांची पत्नी गर्भवती होती. प्रसुतीचे दिवस जवळ आले होते. विभाजन झालेल्या शिवसेनेचा विचार करत असताना एक दिवस पहाटेच्या वेळेत गाढ झोपेत असताना शिवसैनिक पांडुरंग यांच्या स्वप्नात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले. पांडुरंग यांचा शिवसेनाप्रमुखांशी दुभंगलेल्या शिवसेनेविषयी अभासी संवाद सुरू झाला. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आताच्या सुरू झालेल्या राजकारणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली, असे पांडुरंग सांगतात.
हेही वाचा – डोंबिवलीत फडके रस्त्यावर रोटरी क्लबतर्फे आनंदोत्सव
शिवसेनेते जूनमध्ये जे घडले त्याविषयी नापसंती व्यक्त केली. आपणास याविषयी खूप, दुख, क्लेश होत आहे, अशी भावना शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केली, असे पांडुरंग यांनी सांगितले. सगळेच दिवस कायम राहत नाही. ते बदलत असतात. पांडुरंगा, हेही दिवस बदलतील. ‘तुझ्या घरात आता शिवसेना आली आहे,’ असा शिवसेनाप्रमुखांचा बोलता आवाज अचानक बंद झाला. पांडुरंगला अचानक खडकन जाग आली. त्यावेळी आपण स्वप्नात होतो याचा त्यांना भास झाला.
पडलेल्या स्वप्नाचा विचार करत असताना, पहाटेच्या वेळेत पांडुरंग यांची मोठी मुलगी संस्कृती हिचा वडिलांना मोबाईलवरून फोन आला. आईला त्रास होत आहे. आपण तात्काळ निघा. पांडुरंग पहाटेच्या वेळेत पत्नीकडे जाण्यास निघाले. अर्ध्या वाटेत असताना, मुलगी संस्कृतीने पुन्हा वडील पांडुरंग यांना संपर्क करून आई प्रसूत झाल्याचे सांगितले. काही मिनिटांपूर्वीच शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला घरात शिवसेना येत आहे, असा सूचक संदेश दिला होता. त्यामुळे नवजात मुलीला पांडुरंग यांनी शिवसेना नाव देण्याचे निश्चित केले. घरी स्वप्नात घडला प्रकार पांडुरंग यांनी पत्नीला सांगितला. त्यावेळी दोघांनी नवजात बाळाचे नाव शिवसेना ठेवण्याचे निश्चित केले.
माझे नाव शिवसेना… असे फलक शिवसेनेच्या फुटीनंतर सर्वत्र लागले होते. त्या फलकाप्रमाणे आपल्या घरात प्रत्यक्ष शिवसेना आली आहे. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी पांडुरंग यांनी नवजात मुलीचे नाव शिवसेना पांडुरंग वाडकर असे ठेवले. तसा जन्मदाखला करून घेतला. हे बाळ मोठे होईल. शाळेत जाईल त्यावेळी शिवसेना शाळेत जाईल. त्यावेळी शिक्षक, विद्यार्थी तिला काय म्हणतील, अशी चर्चा आता समाज माध्यमात सुरू झाली आहे.