कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका लावल्याने पक्षातील जुन्या जाणत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण येत्या काही महिन्यांमध्ये जाहीर होणार आहे. आरक्षणाची स्थिती स्पष्ट होताच परपक्षातील काही नगरसेवक शिवसेनेत दाखल होण्याची चिन्हे आहेत. या ‘उपऱ्यां’मुळे आपले काय होणार, अशी चिंता शिवसेनेतील निष्ठावंतांना सतावू लागली असून यामुळे पक्षात आतापासूनच नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
अनेक वर्षांपासून शिवसेनेचे प्रभागातील बालेकिल्ले सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केवळ दिग्गज नगरसेवक सेनेत येणार म्हणून बाजूला सारण्यात येत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा नाराजांकडून दिला जात आहे. या निष्ठावान शिवसैनिकांची नाराजी ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेला महागात पडेल, असा इशारा निष्ठावान शिवसैनिकांनी दिला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराजांना गळाला लावण्याची रणनीती शिवसेना नेत्यांनी अवलंबली होती. यापैकी बहुतांश नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांना बऱ्यापैकी आव्हान देणे शिवसेनेला शक्य झाले. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची मोठी ताकद असली तरी भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराजांना गळाला लावण्याची रणनीती आखली जात आहे. डोंबिवलीतील मनसेचे काही नगरसेवक भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कँाग्रेस, राष्ट्रवादीतील इच्छुकांना गळाला लावत भाजपपुढे आव्हान उभे करण्याची रणनीती असली तरी स्थानिक नेत्यांची नाराजी कशी दूर करायची, हा प्रश्न पक्षाच्या नेत्यांना सतावू लागला आहे.
’लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कल्याण, डोंबिवली विधानसभा परिक्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या तीनही पक्षांच्या उमेदवारांचे अक्षरश: पानिपत झाले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत झाल्याचे चित्र समोर आले. यामुळे धास्तावलेले काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही नगरसेवक शिवसेना आणि भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत.
’डोंबिवलीतील काँग्रेस, राष्ट्रवादीमधील सात ते आठ नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत. या नेत्यांच्या आगमनाचे सोपस्कार शिल्लक राहिले आहेत.
’शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट जिल्हा नेत्यांशी संवाद साधून पक्षात आगमनाची तयारी केल्याने पक्षाचे काही पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ आहेत.
’ज्या प्रभागात शिवसेनेची ताकद तुलनेने कमी आहे, अशा प्रभागातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे संबंधित प्रभागातील विभाग प्रमुख, उप शहरप्रमुख, शाखाप्रमुख नाराज आहेत.
कोणीही नाराज नाही
शिवसेनेच्या एका जिल्हा नेत्याने मात्र काँग्रेस आघाडीमधील अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. पण त्यांच्या आगमनामुळे निष्ठावान शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे, असे सांगितले. निष्ठावान सैनिक हा शिवसेनेचा पाया आहे. त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. वेगळ्या पक्षातून येणाऱ्या नगरसेवक, कार्यकर्त्यांमुळे पक्षाची ताकद वाढते, असे या नेत्याने सांगितले.