सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने ठिकठिकाणी लागलेले बॅनर तुम्ही पाहत असाल. रस्त्यात सिग्नलवर, उंच इमारतींवर जिथे तिथे राजकीय नेत्यांची बॅनरबाजी सुरु आहे. पण कल्याणमध्ये आदित्य ठाकरेंचा बॅनर चक्क रस्त्याच्या मधोमध लावण्यात आला आहे. आता हे कसं झालं म्हणत असाल तर, झालं असं की रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या चेंबरचं झाकण तुटल्याने अपघात होऊ नये म्हणून एका दक्ष नागरिकाने लोकांच्या लक्षात यावं यासाठी खूण म्हणून हा बॅनर लावला आहे. मात्र या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा फोटो असल्याने येणा-जाणारे लोकांमध्ये मात्र चर्चा सुरु आहे.
एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ कल्याणमधील असल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना लिहिण्यात आलं आहे की, चेंबरचे झाकण तुटले असल्याने अपघात होऊ नये म्हणून त्यासमोर चक्क आदित्य ठाकरे यांचे बॅनर लावण्यात आला.
दरम्यान आता हा बॅनर कोणी लावला याची माहिती मिळू शकलेली नाही. या बॅनरमुळे लोकांना मदत होत असताना दुसरीकडे विरोधकांनी तर हा बॅनर मुद्दामून लावला नसावा अशीही चर्चा सुरु आहे.
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापुर्वी बुजवले खड्डे
दरम्यान आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा बुधवारी अंबरनाथमध्ये पोहोचली होती. यावेळी मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पाऊस थांबण्याचा हवाला देणाऱ्या पालिका प्रशासनाने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी सर्व खड्डे तातडीने बुजवले. दोन महामार्गाना जोडणारा जोड रस्ता आणि फॉरेस्ट नाका भागात पडलेले हे खड्डे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरले होते. पावसाचे कारण पुढे करत स्थानिक प्रशासनही ते बुजवीत नव्हते. मात्र, जन आशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे यांचा दौरा ठरताच ते बुजविण्यात आले.