ठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदार संघाचा भाग असलेल्या कोपरी भागाचा नुकताच पाहाणी दौरा करत विकास कामांचा आढावा घेतला. या दौऱ्यावरून भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पालकमंत्र्यांवर टिका करत दौरे काढावे लागणे म्हणजे शिवसेनेचे महापालिकेतील पाच वर्षांतील कामाचे अपयशच असल्याचा टोला लगावला आहे. आम्ही पालिकेत ३० वर्षे सत्तेत आहोत. ठाणेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. कुठल्यातरी हवेवर आणि लाटेवर निवडुण येणारा आमचा पक्ष नाही. ठाणे महापालिकेत ठाणेकरांचे काम व्हावे यासाठी पालकमंत्री काम करीत आहेत, असा पलटवार शिवसेनेेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केला आहे. यामुळे पालकमंत्र्याच्या दौऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले.
ठाणे शहरातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या पाहणीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला होता. त्यापाठोपाठ वागळे इस्टेट येथील रस्त्यांची कामे आणि कोपरीतील विकासकामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आढळला, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता संपुष्टात येऊन, महिनाभराचा कालावधी झाल्यानंतर पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोपरी-वागळे इस्टेटमध्ये काढलेले दौरे हे शिवसेनेचे महापालिकेतील पाच वर्षांतील कामाचे अपयशच आहे. कोपरी-वागळे इस्टेट परिसरात अपुर्ण नागरी प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांना दौरा काढावा लागला. पालकमंत्र्यांचा दौऱ्याचा निर्णय म्हणजे शिवसेनेच्या अपयशावरच शिक्कामोर्तब होत आहे, अशी टीका डावखरे यांनी केली आहे.
महापालिकेत शिवसेनेची पाच वर्ष सत्ता होती. ठाणे शहराचा विकास केला असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातो. प्रत्यक्षात ठाणेकरांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. तीव्र पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, फेरीवाले, अतिक्रमणांचा विळखा अशा परिस्थितीत ठाणेकर राहत आहेत. आता महापालिका निवडणुकीचे वेध लागल्यानंतर, पालकमंत्री शिंदे यांच्याकडून दौरे काढले गेले. त्यातून मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणांबरोबरच खुद्द पालकमंत्र्यांच्याच कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील विदारक स्थिती समोर आली. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचा आढावा घेतल्यास आणखी भीषण परिस्थिती समोर येईल. अशा परिस्थितीत पाच वर्षांत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोणती कामे केली? असा प्रश्नही डावखरे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही नागरिकांना काहीही फायदा झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आम्ही पालिकेत ३० वर्षे सत्तेत आहोत. ठाणेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. कुठल्यातरी हवेवर आणि लाटेवर निवडुण येणारा आमचा पक्ष नाही. त्यासाठी तळागाळात काम करावे लागते. ठाणे महापालिकेत ठाणेकरांचे काम व्हावे यासाठी पालकमंत्री काम करीत आहेत. पालिकेत व्यवस्थित काम व्हावे यासाठी आम्ही देखरेख करतो. त्यामुळे तुमचा पोटशूळ आम्ही समजू शकतो. अशा कितीही टिका केल्या तरी आम्हाला त्यांनी फरक पडत नाही. ज्या ठाणेकरांनी आम्हाला ३० वर्षे सत्ता दिली, त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. यापुढेही हे काम करत राहणार, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले.