कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष हे नाव वापरण्यास आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह मिळाल्याने कल्याण, डोंबिवलीतील शिवसैनिकांनी शुक्रवारी संध्याकाळी जल्लोष साजरा केला. कल्याणमध्ये शिवसैनिक आ. विश्वनाथ भोईर, शहराध्यक्ष रवी पाटील यांच्या उपस्थित शिवाजी चौकात जमा झाले होते. डोंबिवलीत इंदिरा चौका, मध्यवर्ति चौकात शिवसैनिकांकडून तालुका प्रमुख महेश पाटील, शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. ढोल, ताशांच्या गजरात महिला, पुरूष नाचगाण्यावर फेर धरत होते. महिला पदाधिकारी फुगड्या खेळून आनंद व्यक्त करत होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या.
VIDEO::
खोके, गद्दार म्हणून हिणवाऱ्यांना हा मोठा धडा आहे, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून देण्यात येत होत्या. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्यासाठी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र बाण्याने निर्णय घेतला. तो योग्य होता. हाच हा निर्णय सांगतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार तुफान वेगाने काम करत आहे. प्रत्येकाला हे आपले सरकार वाटत आहे. विविध विकास कामे मार्गी लावली जात आहे, असे कल्याणचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी सांगितले. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर जल्लोष साजरा केला जात असताना काही वेळ या भागात वाहतूक कोंडी झाली होती.