बदलापूरः भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांमुळे पक्षात पडलेल्या फुटीमुळे भाजपाची पिछेहाट होत असल्याचे चित्र असतानाच आता मुरबाड विधानसभा मतदारसंघावर चक्क शिवसेनेने दावा सांगितला आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकारी बैठकीत शिवसेनेची बदलापूर शहर, ग्रामीण भाग आणि मुरबाड तालुक्यात असलेली ताकद पाहता शिवसेनेसाठी हा मतदारसंघ सोडावा अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचा सूर नुकत्याच झालेल्या या बैठकीत उपस्थितांनी लावला. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे निवडून आल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला. यात मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात खुद्द कपिल पाटील यांनीच आरोपांची राळ उठवली. तर भिवंडी तालुक्यात ज्या भागात शिवसेनेचा प्रभाव आहे त्या भागात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कोकण पदवीधर निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपात प्रचारात कुबरबुरी पहायला मिळाल्या. भाजपच्या नेत्यानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच प्रचार केल्याने शिवसेनेचे नेते दुखावल्याची चर्चा आहे. निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे या वादावर पडदा पडला. मात्र मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मोठा भाग असलेला कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा भाग, अंबरनाथ पंचायत समिती, जिल्हा परिषदचे सदस्य तसेच मुरबाड नगर पंचायत, कल्याण आणि ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद आहे. याच ताकदीवरून आता शिवसेनेने या मुरबाड मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा – नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती; स्थानकाचे काम रेल्वे विभाग करणार, ठाणे महापालिकेचे वाचणार अंदाजे १८५ कोटी

नुकत्याच बदलापुरात झालेल्या पदाधिकारी बैठकीत शिवसेनेच्या सर्वच महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी मुरबाड मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असा सूर लावला. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची ताकद पहायला मिळाली असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. यात २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत कथोरे यांना शिवसेनेमुळे १ लाख ७४ हजार मतांचा पल्ला गाठता आला. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गोटीराम पवार आणि वामन म्हात्रे यांना अनुक्रमे ५९ हजार आणि ५३ हजार मते मिळाली. त्या निवडणुकीत कथोरे हे ८५ हजार मते मिळवून विजयी झाले. आता गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार आणि वामन म्हात्रे शिवसेनेत आहेत. त्यामुळे ही मते शिवसेनेची एकत्र असून आता शिवसेनेची ही ताकद वाढली आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जाईल, असा ठरावही या बैठकीत करण्यात आला. या मागणीमुळे आता मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

हेही वाचा – प्राण्यांवरील अनैसर्गिक अत्याचारांसाठी कलम कोणते?

याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना विचारले असता, शिवसेनेची मुरबाड मतदारसंघात ताकद आहे. त्यामुळे या जागेवर दावा करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे बळही आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले. शिवसेनेच्या मतांमुळेच या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा झाला, असेही म्हात्रे म्हणाले.