डोंबिवली : डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचे नागरीकरण झाले आहे. शिळफाटा, मलंगगड, खोणी पलावा वसाहती पर्यंतचा रहिवासी हा रेल्वे प्रवास, बाजारपेठेसाठी डोंबिवली शहरात येत आहे. डोंबिवली पश्चिम खाडी किनारा परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहून या वस्तीचा भार डोंबिवली शहरावरच आहे. येणाऱ्या भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करुन डोंबिवली रेल्वे स्थानक पूर्व भागात रामनगर ते फडके रोड, इंदिरा चौक आणि पश्चिमेत कोपर पूल ते महात्मा गांधी रस्त्यापर्यंत प्रवाशांना आवश्यक सुविधा देणारा सॅटिस प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे डोंबिवलीतील जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात दोन्ही बाजुंना वाहनतळ, सुस्थितीत रस्ते नसल्याचा त्रास प्रवासी, नागरिकांना होत आहे. येणाऱ्या काळात डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणारी प्रवासी संख्या वाढणार असल्याने आताच रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प राबविणे आवश्यक आहे, असे जिल्हाप्रमुख थरवळ यांनी निवेदनात म्हटले आहे.डोंबिवली रेल्वे स्थानक पूर्व, पश्चिम भागात अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींच्या समुह विकासाला परवानगी दिली तर या इमारतींच्या पुनर्विकासा बरोबर रेल्वे स्थानका लगतचा सॅटिस प्रकल्प उभारणीला हातभार लागणार आहे. डोंबिवली पूर्व पश्चिम रेल्वे स्थानक भागात आता वाहनतळांच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रस्तोरस्ती दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. शहरांतर्गत वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे, असे थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणले आहे.
डोंबिवली शहरात अनेक रस्ते काँक्रिटकरणाने बांधण्यात येणार आहेत. ही कामे करण्यापूर्वी या रस्त्यांखालील जुन्या जीर्ण झालेल्या जलनलिका, मलनिस्सारण वाहिन्या बदलणे आवश्यक आहे. अन्यथा रस्ते कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या कामांसाठी रस्ते खोदले जाण्याची शक्यता आहे. असे प्रकार १० वर्षापूर्वी जवाहरलाल नेहरु अभियानातील कामे करताना करण्यात आले होते. ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रथम रस्त्याखालील जीर्ण जल, मल वाहिन्या बदलून घ्याव्यात. तसेच, या रस्त्यांच्या कडेला महावितरणची जुनाट रोहित्र, मिनी पीलर आहेत. ही यंत्रणा अनेक ठिकाणी सडली आहे. काही ठिकाणी ही रोहित्र रस्त्यांना अडथळा येत आहेत. आता बाजारात लहान आकाराची आटोपशीर रोहित्र उपलब्ध आहेत. त्याचा वापर महावितरणने करुन जुनी यंत्रणा काढून टाकावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख थरवळ यांनी केली आहे.
हेही वाचा : डोंबिवली : बालिकेच्या मदतीने भिक्षा मागून गुजराण करणाऱ्या आजी-आजोबांना अटक
इमारत बांधकाम परवानग्या देताना अलिकडे कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. नवीन इमारतींमधील आराखड्यातील वाहनतळ रद्द करण्याचे प्रकार वाढले आहेत. या बदल्यात विकासकांकडून शुल्क आकारले जाते. अशा टोलेजंग इमारतींमधील वाहने मग रस्त्यावर उभी केली जातात. हे दृश्य विविध भागात पाहण्यास मिळते. त्यामुळे नगरचना विभागाने बांधकाम परवानग्या देताना नियमांचे पालन करावे. यासाठी पालिका आयुक्तांना आदेशीत करण्यात यावे, अशी मागणी थरवळ यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.
डोंबिवली शहरावरील परिसरातील नागरी वस्तीचा भार विचारात घेऊन आताच रेल्वे स्थानक भागात सॅटिस प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातील असल्याने आणि त्यांना डोंबिवली शहराची जाण असल्याने सॅटिसची मागणी आपण केली आहे. – सदानंद थरवळ , शिवसेना जिल्हाप्रमुख, डोंबिवली