राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे शिवसेनेमध्ये सध्याच्या घडीला दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे मंत्री असणारे एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ‘नॉट रिचेबल’ आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप घडवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराऐवजी भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून आल्याचा निकाल समोर आल्यापासून शिंदे हे पक्षाच्या संपर्कात नाहीत. शिंदे हे त्यांच्या निकटवर्तीय आमदारांसोबत गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदेंना २५ ते ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. ही संख्या शिवसेनेच्या एकूण आमदार संख्येच्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे पुढे काय करणार आणि महाविकास आघाडी सरकार पडणार का? यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या भाजपाकडे १०६ आमदार आहेत. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आणि काँग्रेसचे ४४ आमदार सध्याच्या विधानसभेमध्ये आहेत. २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरुन शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये मतभेद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत महाविकास आघाडी सरकारची स्थापना करत बहुमताचा १४५ चा जादुई आकडा गाठला. मात्र तेव्हापासूनच वेळोवेळी हे सरकार पडणार असं विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून सांगण्यात आलं. वेळोवेळी तारखा देत भाजपा नेत्यांनी हे तीन चाकाचं सरकार टीकणार नाही असा दावा केला.
एकनाथ शिंदेंसोबत राज्यातील कोण आमदार आहेत? ही घ्या संपूर्ण यादी
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अपक्ष आमदार रवी राणा यांनीही योग्य वेळी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केल्यानंतर आज सकाळपासूनच एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. अशातच एकनाथ शिंदेसोबत २५ ते ३० आमदार असल्याचा दावा केला जातोय. एकनाथ शिंदेंबरोबरच १४ आमदारही नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जात आहे.
काय असू शकतं गणित?
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे सरकार पडणार की नाही याबद्दल मतमतांतरे असली तरी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतांची जुळवाजुळव केली ती पाहता २५ ते ३० शिवसेना आमदार फुटल्यास सत्तेची गणित बसवणं भाजपासाठी कठीण जाणार नाही असं चित्र दिसत आहे. भाजपाचे १०६ आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे २५ आणि अपक्ष अशी मोट बांधून भाजपा बहुमताचा १४५ चा आकडा गाठू शकते.
नाराज एकनाथ शिंदे
राज्यातील शिवसेनेचे दुसरे सर्वात महत्वाचे नेते असणारे एकनाथ शिंदे हे मागील बऱ्याच काळापासून पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाबरोबरच ठाण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेने आपली विजयी पताका सर्वात आधी ठाण्यात रोवली होती. तेव्हापासूनच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.
यापूर्वीही बंड झाले पण यंदा परिस्थिती वेगळी
यापूर्वीही शिवसेनेमध्ये बंड झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र मुख्य ठाणे शहरामध्ये शिंदेसारख्या मोठ्या नेत्याने बंड करणे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. ठाण्यामध्ये शिवसेनेची ताकद ही मुंबईपेक्षाही अधिक असल्याचं सांगितलं जातं. तसेच ठाण्यात एकनाथ शिंदे हा शिवसेनेचा चेहरा आहे. एकनाथ शिंदे हे यापूर्वीही नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र वेळोवेळी त्यांनी ही वृत्तं फेटाळून लावली होती. मात्र यंदा चित्र फारच वेगळं दिसत आहे. सध्याच्या घडीला शिवसेनेकडे शिंदेंइतकं मोठं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये नाही. त्यामुळे शिंदेंनीच बंड केल्यास पुढील प्रवास शिवसेनेसाठी फारच खडतर ठरु शकतो.
सर्वात पहिला विरोध ठाण्यातून व्हायचा…
जेव्हा जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाली तेव्हा सर्वात आधी विरोध ठाण्यातील शिवसैनिकांनी केल्याचं पहायला मिळालं. आज मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. आज ठाण्यातील शिवसेनेचे बालेकिल्ले असणाऱ्या टेंभी नाका, आनंद मठ, एकनाथ शिंदेंचं निवासस्थान, महानगरपालिका या परिसरामध्ये शुकशुकाट आहे. सामान्यपणे शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर सर्वात आधी विरोध शिवसेनाभवनासमोर आणि नंतर टेंभी नाक्यावर केला जायचा.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत…
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये एकनाथ शिंदेंचं नावही होतं. मात्र शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील अशी भूमिका घेतल्याने एकनाथ शिंदेंचं नाव मागे पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम शिवसेनेमधील दुय्यम स्तरातील जबाबदारी सोपवण्यात आली. मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसंदर्भातील समस्यांमुळे कारभार इतर नेत्यांकडे सोपवण्यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्या तेव्हा सुद्धा शिंदेंचेचं नाव चर्चेत आलेले. यासंदर्भातील एका अफवेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.
संघनिष्ठ शिंदे…
एकनाथ शिंदेंनी कल्याण, डोंबिवलीबरोबरच ठाण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या शाखेंसोबत कायमच चांगले संबंध ठेवले. काँग्रेसोबत युती केल्यापासून शिंदे आणि समर्थक अस्वस्थ होते असं सांगितलं जातं. महाविकास आघाडीमध्ये असतानाही शिंदेंनी संघासोबतचे आपले संबंध बिघडू दिले नाहीत.