कल्याण – कल्याण पूर्वे विधानसभा मतदारसंघात भाजपने प्रस्थापित भाजप आमदार किंवा त्यांच्याच कुटुंबात उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचा इशारा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे कल्याण पूर्वेत महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार ताणाताणी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
महायुती म्हणून भाजपने कल्याण पूर्वेत जरूर उमेदवार द्यावा. आम्ही त्याचे महायुतीचा धर्म म्हणून नक्की काम करू. पण हा उमेदवार देताना त्याच व्यक्तीला किंवा त्याच घराचा (आमदार गणपत गायकवाड) विचार झाला तर मात्र जनतेच्या भावनांचा विचार करून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहोत, असे महेश गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा – ठाणे : निराधार मुलांची “फिरती शाळा” बंद !
हिललाईन पोलीस ठाण्यात शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर एका जमीन प्रकरणावरून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यापासून महेश गायकवाड आणि भाजपचे गणपत गायकवाड कुटुंबात वितुष्ट आले आहे. आमदार गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे तळोजा कारागृहात आहेत. त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड मतदारसंघातील नागरी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी कार्यरत आहेत.
कल्याण पूर्वेतून आमदार गायकवाड यांना उमेदवारी मिळणार नाही असा अंदाज बांधून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून विशाल पावशे, नीलेश शिंदे, महेश गायकवाड इच्छुक आहेत. पावशे, शिंदे यांना पक्ष वरिष्ठांनी गप्प बसविल्याची चर्चा आहे. कल्याण पूर्व हा आमदार गणपत गायकवाड यांचा पारंपारिक बालेकिल्ला. आता ते भाजपचे नेतृत्व कल्याण पूर्वेत करत आहेत. गेल्या १५ वर्षाच्या कालावधीत आमदार गायकवाड यांनी विकासाची कामे केली नाहीत. कल्याण पूर्व भाग विकासापासून दूर राहिल्याने त्याचे चटके आता नागरिकांना बसत आहेत, अशी टीका वेळोवेळी महेश गायकवाड यांनी यापूर्वी केली आहे. आता ते आमदार गायकवाड यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करत आहेत.
कल्याण पूर्वेचे अनेक वर्ष शोषण झाले. हा भाग भकास झाला. सामान्य जनतेला आता विकास हवा आहे. या विकासासाठी १५ वर्ष मागे राहिलेल्या कल्याण पूर्व भागाला सामान्य लोकांच्या मागणीप्रमाणे आपण पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. भाजपने या भागात उमेदवार दिल्यास आपण काम करू. त्याच घरातील आणि त्याच व्यक्तीला उमेदवारी दिल्यास मात्र आपण वेगळा विचार करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहोत, असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे. महेश यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. शिंदे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
हेही वाचा – ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
महायुतीत कोणालाही स्वत:ची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही. महायुतीचे नेते यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. कल्याण लोकसभा क्षेत्रात आता कार्यकर्ते महायुतीच्या कामाला लागले आहेत. – शशिकांत कांबळे, प्रदेश नेते, भाजप.
कल्याण पूर्वेत १५ वर्षात विकास कामे झाली नाहीत. हा भाग भकास झाला आहे. लोकांना आता विकास हवा असल्याने जनभावनेचा विचार करून आपण पुढची पावले टाकणार आहोत. – महेश गायकवाड, शहरप्रमुख, कल्याण पूर्व.