मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. तेव्हापासून शिवसेना खासदार अरविंद सावंत शिंदे गटावर टीकास्त्र सोडत आहेत. आताही अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. नाव एकनाथ पण असूनी नाथ ते अनाथ आहेत. घरका ना घाटका होतील. भाजपा त्यांचा वापर करुन फेकून देईल, असं अरविंद सावंतांनी ठाण्यात बोलताना म्हटलं आहे.
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अरविंद सावंत बोलत होते. “इतभर तुझे पोट केवढी तुझी हाव. या हावेसाठी महाराष्ट्राला लांच्छन लावण्याचं काम करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना प्रचंड दु:ख होत असेल. बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईपेक्षा अधिक प्रेम ठाण्यावर होतं”, असं अरविंद सावंत म्हणाले.
हेही वाचा : “माझी शरद पवारांना विनंती आहे की…”, संजय गायकवाडांचं राष्ट्रवादीवर टीकास्र; म्हणाले, “शरम वाटली पाहिजे!”
“ठाण्याने शिवसेनेला पहिला नगरसेवक दिला. पहिली निष्ठा ठाण्याने शिकवली. एक गद्दार निघाल्यावर सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेऊन टाकले. पाच वर्षे महापालिकेत बसले नाहीत. ही निष्ठा धर्मवीर आनंद दिघेंनी शिकवली,” असेही अरविंद सावंतांनी सांगितलं.
हेही वाचा : “भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई…”, राज्यपालांचा एकेरी उल्लेख करत मिटकरींचा भाजपाला खोचक सवाल!
“नागरिकांच्या रेशनचं काम, मुलांच्या शाळेचा प्रवेश असो अथवा फी, रुग्णवाहिका अशी कामं आनंद दिघे यांनी केली. आनंद दिघे म्हणजे विद्यापीठाच होतं. हे ठाणे असं होतं. पण, आज त्या ठाण्यात आज घाण पसरली आहे. जेव्हा प्रदूषण पसरत, तेव्हा ऑक्सिजन घेऊन कोणतरी उभे राहावं लागतं. यासाठी राजन विचारे, मोहिते, खोपकर, बिर्जे उभे राहिले,” असेही अरविंद सावंतांनी म्हटलं.