ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या समाजमाध्यमांवरील संदेशामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे आभार, असे सांगत त्यांनी काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नसला तरी त्यांनी मैत्री निभावल्याचे म्हटले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी मदत केल्याची कबुली म्हस्के यांनी दिल्याने आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. परंतु त्यातील मजकुरामुळे या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. ठाणे महापालिकेत नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि ठाण्याचा महापौर म्हणून गेली वीस वर्षे काम करत होतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्याचमुळे महापालिकेतील कारकीर्द माझी यशस्वी ठरली. महापालिकेतील सर्वच नगरसेवक माझ्या पाठीशी उभे राहिले, मी घेत असलेल्या निर्णयांना वेळोवेळी पाठिंबा दिला, त्यामुळे ठाण्याचा प्रथम नागरिक महापौर या नात्याने मी शहरात यशस्वीपणे काम करू शकलो, कोविडच्या काळातही आपण सगळ्यांनी मिळून ठाणेकरांना दिलासा देणारे काम केले, असे म्हस्के यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – ठाण्यातील उंच इमारतीतील सदनिकेत आग, कुटुंबियांना वाचविताना एकाचा मृत्यू

हेही वाचा – डोंबिवली पश्चिमेचा वीज पुरवठा दहा तास बंद

एका वॉर्डातून बाहेर पडून एक नगरसेवक ते महापौर पदावर काम करत असताना आपण जो माझ्यावर ‍विश्वास ठेवलात, त्याच विश्वासाच्या बळावर मी थेट संसदेत खासदार या पदापर्यंत पोहोचलो आहे. या संपूर्ण प्रवासात तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा सहकार्य मदत लाभली म्हणूनच हा प्रवास सोपा झाला. विशेषत: लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष, आमची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित दादा पवार गट आणि मनसे यांनी मदत केली. त्यामुळे ही निवडणूक मला यशस्वीपणे प्रचंड मताधिक्याने जिंकता आली, असे सांगत अर्थात काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नाही. पण माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण मैत्री निभावून अप्रत्यक्षपणे मला निवडून आणण्याकरिता मदत केलीत. त्यामुळेच मला प्रचंड मताधिक्य ‍मिळाले. मला ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून आभार, असे त्यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी म्हस्के यांना निवडणुकीत मदत केल्याची चर्चा सुरू झाली असून ते नगरसेवक कोण याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp naresh mhaske says some did not openly but maintained friendship excitement due to messages on social media ssb