ठाणे : ठाणे लोकसभेची उमेदवारी बुधवारी शिंदे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांना जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच, त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ज्यांनी शिवसेना प्रमुखांची भूमिका खुंटीला टांगली, ज्या शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला विरोध केला याउलट यांनी काँग्रेससोबत जाऊन दिल्लीचे उंबरठे झिजवले. यांची कसली आली निष्ठा. ठाण्यातील शिवसैनिक दाखवतील. निष्ठावंत कोणाला म्हणतात अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर शिंदे गटाने ठाण्याचे माजी महापौर तथा शिंदे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच, नरेश म्हस्के यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. एका कार्यकर्त्याला ही संधी मिळाली हे फक्त शिवसेनेत होऊ शकते. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या सहकार्याने या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न करेल. हिंदुत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करेल. मला कोणाचे आव्हान वाटत नाही असे म्हस्के म्हणाले. उमेदवारी उशीरा जाहीर झाली असली तरी आम्ही यापूर्वीच प्रचार सुरू केला होता. आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहचू. आम्ही निवडणूकांपर्यंत मर्यादित नसतो. ३६५ दिवस आमचा कार्यकर्ता लोकांमध्ये असतो असेही ते म्हणाले.

हेही वाचा : शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रमाण, बांधकामांवरील मजूर, कष्टकऱ्यांनाही फटका

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ज्यांची शक्ती नसते. त्याला ती ओढून-ताणून दाखवावी लागते. आमची परिस्थिती तशी नाही. आम्ही अर्ज भरू तेव्हा कळेलच. करोनाकाळात खासदार असून जीव वाचविण्यासाठी घरी बसले. जनतेचे सोडा, कार्यकर्त्यांच्या मदतीला ते धावले नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: पीपीई कीट घालून रस्त्यावर उतरले होते. मी स्वत: जनतेच्या मदतीला धावून जात होतो अशी टीका त्यांनी राजन विचारे यांच्यावर केली. नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी टेंभीनाका येथे जाऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena s thane lok sabha candidate naresh mhaske said shivsainiks of thane will show who is loyal css