कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या माजी आमदार सुभाष भोईर, कल्याण पश्चिमेतील माजी सभापती आणि ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी आपल्या ताकदीने शिवसैनिक, पदाधिकाऱी यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. हे दोन्ही इच्छुक ठाकरे गटाच्या वरिष्ठांशी उमेदवारीसाठी संपर्क साधून असल्याचे समजते. कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे हे तगडे उमेदवार आहेत. या मतदारसंघात तुल्यबळ लढत झाली पाहिजे अशी ठाकरे गटातील शिवसैनिकांची तीव्र इच्छा आहे.
कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी गेल्या आठवड्यापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, सामान्य शिवसैनिक यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या बैठकांमध्ये शिवसैनिकांकडून हरदास यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक लढवावी म्हणून गळ घातली जात आहे. भिवंडी लोकसभेची इच्छुक उमेदवार जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे यांची भेट घेतल्यानंतर बाळ हरदास यांनी कल्याण लोकसभा हद्दीत कार्यकर्ते भेटीगाठीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हरदास यांना कल्याण लोकसभेसाठी सांबरे यांची साथ मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. हरदास हे कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेनेचे नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती, कामगार संघटनेचे नेते अशी अनेक पदे भुषविली आहेत.
हेही वाचा : डोंबिवलीत गोदामे, बेकायदा चाळी भुईसपाट
नेत्यांच्या भेटी
कल्याण लोकसभा निवडणूक लढवायची की नाही या संंभ्रमावस्थेत असलेले कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभेची निवडणूक पूर्ण क्षमतेने लढवावी म्हणून ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून दबाव वाढत आहे. या उमेदवारीला शिंदे गटातील काही अस्वस्थांनी साथ देण्याची तयारी दर्शविली असल्याचे भोईर समर्थकांकडून समजते. कल्याण ग्रामीण परिसरातील आगरी समाजातील संस्था, संघटनांंनी भोईर यांनी निवडणूक लढवावी म्हणून गळ घातली आहे. दररोज शेकडो शिवसैनिक भोईर यांच्या शीळ येथील घरी जाऊन त्यांनी निवडणूक लढवावी म्हणून आर्जव करत आहेत.
याशिवाय आगरी समजातील ठाणे, नवी मुंबई, भिवंडी परिसरातील ज्येष्ठ मंडळी, नेत्यांच्या भेटी घेऊन उमेदवारी विषयी भोईर चर्चा करत आहेत. कळवा-मुंब्रा, कल्याण पूर्व, २७ गावातील शिवसैनिकांंनी भोईर यांच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. उल्हासनगर, डोंबिवलीतील अस्वस्थ भाजप कार्यकर्ता, नाराज शिवसैनिक भोईर यांच्या संपर्कात असल्याचे समजते. कल्याण लोकसभा मतदारसंघात बाहेरच्या उमेदवारापेक्षा स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याची जोरदार मागणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून पक्षप्रमुखांकडे केली आहे. अधिक माहितीसाठी माजी आमदार सुभाष भोईर यांना संपर्क साधला. ते बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्या स्वीय साहाय्यकाने सांगितले.
हेही वाचा : महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
कल्याण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक आहोत, असे आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना कळविले आहे. आपण स्थानिक आहोत. आपल्या उमेदवारीविषयी शिवसैनिकांची मते जाणून घेण्यासाठी आपण कल्याण लोकसभा मतदारसंघात मागील चार दिवसांपासून दौरा करत आहोत.
बाळ हरदास (ज्येष्ठ शिवसैनिक)