लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : चक्कीनाका येथील बालिका हत्याप्रकरणातील गुन्हेगारांना फाशी द्यावी, या मागणीसाठी गुरुवारी संध्याकाळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर शाखेतर्फे कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने कल्याण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांना निवेदन दिले.

बालिकेच्या हत्येमुळे कल्याण शहर हादरले आहे. याविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा संताप गुरुवारी नागरिकांनी ठाकरे गटाच्या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केला. शिवसेनेच्या या मोर्चात नागरिक, महिला, पुरूष अधिक संख्येने सहभागी झाले होते. निर्भयाला न्या द्या, आरोपीला फाशी द्या, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

कल्याण पूर्व शिवसेना शहर शाखा येथून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त मोर्चाच्या मार्गावर ठेवण्यात आला होता. हत्या झालेल्या बालिकेवर गुरुवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेतून नागरिक थेट मोर्चात सहभागी झाले होते. गु्न्हेगारांची चौकशी करण्याऐवजी त्यांना नागरिकांच्या हातात द्या, असाही मोर्चेकरांचा सूर होता.

आणखी वाचा-Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग

मोर्चात जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, युवा नेते दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख शरद पाटील, प्रकाश तेलगोटे, नारायण पाटील, राजेंद्र साहू, मीना साळवे, वसुधा बोडारे, ॲड. नीरज कुमार, साधना पारडे, रेखा येवले, मनीषा कटके, जया तेजी सहभागी झाले होते.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यासमोर पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी जिल्हाप्रमुख बोडारे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. आता सामान्यांचे जीव जाऊ लागले आहेत. गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त मिळत आहे. कल्याण शहर परिसरात अंमली पदार्थ तस्करी, नृत्यबार, गांजाचे अड्डे सुरू आहेत. त्याचा परिणाम म्हणजे ही वाढती गुन्हेगारी आहे. या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्याची वेळ आली आहे. बालिकेची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे.

आणखी वाचा-कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित

राज्यात लाडक्या बहिणीवर पाशवी अत्याचार केले जात आहेत. या घटनेचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो. अशा गुन्हेगारांना राजकीय पाठिंबा असल्याने ते पुन्हा अशी नृशंस कृत्ये करण्यास धजावत आहेत. झोपी गेलेल्या सरकारने पीडित कुटुंबाला २५ लाखाची मदत द्यावी, अशी मागणी युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी केली. मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी झाली नाहीतर ठाकरे गटातर्फे उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena thackeray groups protest march in kalyan over minor girls murder case mrj