शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटाने यंदा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कुणाच्या मेळाव्याला गर्दी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातून शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याकरिता जोरदार तयारी सुरू असतानाच, आता ठाकरे गटानेही जांभळी नाक्यावर शक्रिप्रदर्शन करत दसरा मेळाव्याला जाण्याचे नियोजन आखले आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान विश्वस्तपदासाठी रविवारी निवडणूक; चार नवीन चेहऱ्यांना संधी
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील शिवतीर्थावर जाण्याची परंपरा शिवसैनिक कायम ठेवणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी उद्या, बुधवार दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर दुपारी साडेतीन वाजता खासदार राजन विचारे व जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातील हजारोच्या संख्येने शिवसैनिक रंगो बापूजी गुप्ते चौक तलावपाळी जांभळी नाका उपस्थित राहणार आहेत व त्यानंतर वाजत गाजत ठाणे रेल्वे स्थानकावरून दादर स्टेशनवर उतरून शिवतीर्थावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी दिली. हा दसरा मेळावा अभूतपूर्व असा असेल, असा दावा त्यांनी केला आहे.