मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर जवळील चेरपोली येथे शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसगाडीला आग लागली. या बसगाडीत १८ प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत अग्निरोधक यंत्रणेद्वारे आग आटोक्यात आणली. या घटनेत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
हेही वाचा- मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपूलावर ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
मुंबई येथील बोरीवलीमधून शिवशाही बसगाडी सकाळी नाशिकच्या दिशेने निघाली होती. ही बसगाडी शहापूर येथील चेरपोली जवळ आली असता बसगाडीतील यंत्रातून धूर निघू लागला होता. चालक अशोक लहामगे यांनी तत्काळ बसगाडी उभी करून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर अग्निरोधक यंत्राद्वारे आग आटोक्यात आणली. त्यानंतर शहापूर नगरंचायतीच्या अग्निशमन यंत्रणांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अधीक्षक भाग्योदय परदेशी, कर्मचारी सागर डिंगोरे व अनिरुद्ध खाडे यांनी आग आटोक्यात आणली. पोलिसांच्या मदतीने सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसगाडीमधून पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.