नेमबाजांना सरावाची संधी; ६५ लाखांच्या निधीची तरतूद; सप्टेंबरअखेपर्यंत प्रकल्प पूर्ण
दादोजी कोंडदेव या ठाण्यातील एकमेव स्टेडियममधील अडगळीतल्या जागेची स्वच्छता करून त्याजागी शूटींग रेंजची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील नेमबाजांना सरावासाठी त्याचा उपयोग होणार आहे. सध्या त्याचे काम सुरू असून सप्टेंबर अखेरीस ते खेळाडूंना उपलब्ध होईल, अशी माहिती क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली. तब्बल ६५ लाख रूपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या शूटींग रेंजमध्ये खेळाडूंना सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध असणार आहेत.
अभिनव बिंद्राला ऑलिंपिक स्पर्धेत विजय मिळाल्यानंतर रायफल शूटींग या क्रीडा प्रकाराची लोकप्रियता वाढली. ठाणे परिसरातूनही अनेकजण नेमबाजीत स्वत:ला आजमावू लागले आहेत. मात्र जिल्ह्य़ात या खेळाच्या सरावासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडू सरावापासून वंचित होते. दादोजी कोंडदेव स्टेडिअममधील शूटींग रेंजमुळे त्यांची सोय होऊ शकेल. त्यामुळे ठाण्यातील खेळांडूंना आता शुटींग रेंजसाठी ऑलम्पिकची स्वप्ने रंगवता येणार आहेत. इतकेच नव्हे तर ही शुटींग रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाची असेल. तिथे विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातील.
या शुटींग रेंजमध्ये १५ जणांना एकाचवेळी खेळता येणार आहे. स्टेडिअममधील ही शुटींग रेंज पूर्णत: वातानुकुलीत असेल. तिथे खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी दोन खोल्या तयार करण्यात येणार असून खेळाडूंचे खेळाचे साहित्य ठेवण्यासाठीही एक स्वतंत्र कक्ष असणार आहे. या आधी ही जागा स्टेडियमधील भंगार टाकण्यासाठी वापरली जात होती. मात्र या जागेचा काहीतरी उपयोग व्हावा असे स्टेडीयममध्ये सराव करण्यासाठी येणारे खेळाडू आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अतिरीक्त आयुक्त सुनिल चव्हाण तसेच क्रिडा अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर जवळजवळ १७ बाय १७ इतक्या क्षेत्रफळाची जागा या शुटींग रेंजसाठी वापरण्यात आली आहे.
गगन नारंग आणि सीमा शिरूर या जागतिक कीर्तीच्या शुटींग अकादमीने स्टेडीयममधील शुटींग रेंजवर ऑक्टोबरदरम्यान एक स्पर्धा भरविण्यासाठी एक अर्जही दाखल केला आहे. उद्घाटन होण्याआधीच शूटींग स्पर्धेसाठी अर्ज यायला लागले असून त्यामुळे या शुटींग रेंजविषयी किती उत्सुकता आहे, हे दिसून येते. ठाण्यातील शुटींग खेळाडूंना याचा फायदा व्हावा यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येतील.
– मीनल पालांडे, क्रिडा अधिकारी