कल्याण – कल्याण पूर्व भागात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी एका रात्रीत चोरट्यांंनी चार ते पाच दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी रात्री चोरट्यांनी कोळसेवाडी, मानपाडा, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्या. यामध्ये एका पत्रकाराच्या दुकानाचे मुख्य लोखंडी प्रवेशव्दार तोडून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज चोरून नेला. पोलिसांंनी सांगितले, पत्रकार सुभाष विश्राम कदम (५४) हे कल्याण पूर्वेतील दुर्गा माता मंदिर परिसरात राहतात. त्यांचे कोळसेवाडी शिवसेना शाखेसमोरील साईनाथ भवन इमारतीत एका गाळ्यात अन्नपूर्णा नावाने दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी दुकान उघडून रात्री दहा वाजता दुकान बंद करतात.
हेही वाचा >>> निळजे गावाजवळील रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांचे जनआंदोलन
बुधवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. दुकानात ग्राहक सामान विक्रीतून मिळालेले एक लाख पाच हजार रूपये तिजोरीत होते. चोरट्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या कदम यांच्या दुकानाचे लोखंडी प्रवेशव्दार धारदार हत्याराने तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामानाची फेकाफेक करून दुकानातील कुलुप बंद असलेला गल्ला तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख रूपयांची रोख रक्कम आणि काही सुट्टे पैसे चोरून नेले. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कदम दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना दुकानाचे प्रवेशव्दार तोडले असल्याचे दिसले. त्यांनी दुकानात पाहिले तर सामानाची फेकाफेक केली होती आणि गल्ल्याचे कुलूप तोडून त्यामधील रोख रक्कम चोरून नेली होती. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पत्रकार सुभाष कदम यांनी तक्रार केली आहे. कोळेगावातील कंत्राटदार अखिलेश चव्हाण यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी मंगळवारी रात्री दोन लाखाचा ऐवज चोरून नेला. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चोळेगावातील रहिवासी राजकुमार यादव यांची ९० फुटी रस्त्यावर उभी करून ठेवलेली रिक्षा चोरट्यांनी मंंगळवारी रात्री चोरून नेली. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणेरी कपडा दुकान, केअर मेडिकल दुकान, अमृत पॅलेसबार दुकानांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद झाले आहेत. त्याचा तपास पोलीस करत आहेत.