ठाणे – होळी आणि धुळवडीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. यानिमित्त शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांनी सजल्या आहेत. यंदा शहरातील बाजारपेठांत इलेक्ट्रिक वॉटर गन तसेच कार्टुनचे छायाचित्र असलेल्या पिचकारीची क्रेझ वाढली आहे. त्याचप्रमाणे यावर्षी नैसर्गिक रंगांना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.
विविध सामाजिक संस्था आणि प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलेल्या रसायनयुक्त रंगांचा वापर टाळण्याच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रासायनिक रंगांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे नागरिक नैसर्गिक रंगांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात नैसर्गिक रंगांची मागणी वाढली आहे. विविध रंगांची सुगंधी फुले, कॉर्नस्टार्च, नैसर्गिक सुगंधी तेल इत्यादी पदार्थ वापरून हे रंग तयार केले जातात. त्यामुळे मानवी शरीराला कोणतीही इजा पोहोचत नाही. सध्या बाजारात १०० ते ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारचे रंग विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ५० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत विविध आकारांतील आणि रंगांतील पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टूनचे छायाचित्र असलेले विविध आकारांतील पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये डोरेमॉन, स्पायडर मॅन, मिकी माऊस, डोनाल्ड डक, छोटा भीम आहे. तसेच बटनवाली पिचकारी देखील उपलब्ध आहे. त्यामध्ये घोडा, बटरफ्लाय, बंदूक, बेडूक असे विविध प्रकार आहेत. या पिचकाऱ्या ५०० ते १२०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. तरुणाईसाठी मोठ्या प्रेशरच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच होळी निमित्त विशेष टी-शर्ट देखील बाजारात पहायला मिळत आहेत.
यंदा होळी आणि धुळवड पगाराच्या तारखेत आल्याने खरेदीमध्ये वाढ होत आहे. तसेच पर्यावरणपुरक असे रंग यंदा बाजारात दाखल झाले आहेत. पर्यावरणपुरक रंगांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. – हेतल कोटक, विक्रेते