ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंब्र्यातील दुकाने आणि रिक्षा सेवा बंद करण्यात आली आहेत, बंद पाळण्यात येत आहे. या बंदमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. दुकाने बंद असल्यामुळे सकाळच्या वेळेत अनेकांना गृहपयोगी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर सामान मिळाले नाही. रिक्षा उपलब्ध नसल्याने नागरिकांना चालतच जावे लागले. मुंब्र्यातील या बंदचा फटका नागरिकांना सहन करावा लागला.
हेही वाचा… जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video
मुंब्रा वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पूलाचे लोकार्पण होते. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीत बसून जात असताना भाजपची महिला पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यास दाबून “ काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो”असे म्हणत ढकलले. अशी तक्रार महिलेने दिली आहे. याप्रकरणी आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे वृत्त कळताच मुंब्रा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना दुकानातील वस्तू उपलब्ध झाल्या नाहीत. तसेच मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा थांब्यावरही संघटनांनी बंद पाळला. शहरात रिक्षा धावल्या नाहीत. नागरिकांना चालतच स्थानक गाठण्याची वेळ आली. सकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच ठिकठिकाणी टायर जाळले.