येथील काळा तलाव चौक परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात इसमांनी दोन रिक्षा आणि स्कूटर अशी एकूण तीन वाहने जाळली. रिक्षाचालक डिंपू अशोक सिंग (३१) यांनी केलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांनी आपल्या घरासमोरील भागात त्यांची रिक्षा उभी केली होती.
सिंग यांच्या रिक्षाच्या बाजूला प्रशांत रसाळ यांची रिक्षा आणि अशोक राजभर यांची स्कूटर उभी होती. अज्ञातांनी या तिन्ही वाहनांना आग लावली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसाखळी चोर मोकाट
कल्याण : ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात सक्रिय असलेल्या दोन टोळ्या जेरबंद केल्या असल्या तरी शहरात अन्य टोळ्यांचा उपद्रव मात्र सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे सोनसाखळी चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नसल्याचे चित्र आहे. खडकपाडा भागात मीरा भगवान टिकारे (४८) राहत असून मंगळवारी सकाळी त्या राधानगरी परिसरात फेरफटका मारत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरांनी त्यांच्या गळय़ातील ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा परिसरात राजश्री संपतराव पवार (५०) आणि कळवा परिसरात स्नेहल सुरेश साळुंखे (५०) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी चोरून नेले.
अपघातात मुलीचा मृत्यू
ठाणे : घोडबंदर परिसरात एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत रिक्षाचालक महेश तांबडा जखमी झाले तर त्याची दोन वर्षीय मुलगी लताश्रीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. घोडबंदर रोडवरील ओवळा बाजूकडे जाणाऱ्या वाहिनीवरून महेश तांबडा रिक्षाने जात होते. त्यावेळी रिक्षामध्ये त्यांची पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी होती. दरम्यान, एका भरधाव ट्रकने त्यांच्या रिक्षाला धडक दिली आणि तो जागेवरच उलटला. या अपघातात महेश तांबडा जखमी झाले तर त्याची दोन वर्षीय मुली लताश्रीचा मृत्यू झाला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घोडबंदर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहतूक पोलिस पथकाची मागणी करण्यात येत आहे.
डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली : डोंबिवली परिसरातील शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या रमणलाल ओमप्रकाश वर्मा (३५) यांच्या घरी बुधवारी चोरी झाली. वर्मा यांच्या घराचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरटय़ांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि ९८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरटय़ांनी वर्मा यांच्या घरातून लंपास केले. याप्रकरणी अज्ञातांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीचा विनयभंग
डोंबिवली : डोंबिवली शहरात एका २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी घडली. कल्याण येथील काळा तलाव परिसरात राहणाऱ्या सुरेंद्र पांडुरंग जैनजागंडे (२७) याने डोबिंवली येथील दीनदयाळ रोडवर कामावरून घरी जाणाऱ्या पीडित तरुणीस हटकून लग्नाची मागणी घातली. तसेच नकार दिल्यास तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. या प्रकाराने बिथरलेली तरुणी घरी जात असताना आरोपी सुरेंद्र याने तिचा हात पकडला आणि तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांत सुरेंद्र याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.