कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात वेगवान दुचाकीला झालेल्या अपघातात बहिणीच्या मृत्यूप्रकरणी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक सिंह असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे, तर भारती सिंह असे मृत तरुणीचे नाव आहे. भारती हिचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला असला तरी रस्त्यांवरील खड्डय़ांतून वाहने चालवणे चालकांसाठी धोक्याचे बनले आहे. काहीवेळा पादचाऱ्यांच्या जिवावर बेतत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी केवळ चालकाचा हलगर्जीपणा समजून गुन्हा दाखल केला असेल तर त्याची चौकशी होणे, गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
अभिषेक याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन आदळली. या दुर्घटनेत दुचाकीवर मागे बसलेली भारती ही रस्त्यावर फेकली गेली. यात तिला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. अभिषेक याने निष्काळजीपणे वाहन चालवून बहिणीच्या मृत्यूस कारण ठरल्याबद्दल कोळसेवाडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती हवालदार दिलीप परदेशी यांनी दिली.कल्याण, डोंबिवली परिसरात गेल्या तीन ते चार वर्षांत अशा स्वरूपाचे आठ ते नऊ अपघात घडले आहेत. रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने तसेच रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. यात दुचाकी चालकांना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होते. प्रसंगी काही जण मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अपघाताबद्दल चालकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा महापालिका अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बखोटी पकडून त्यांना गजाआड करण्याची मागणी संतप्त नागरिक पोलिसांकडे काही वर्षांपासून करत आहेत.

एमडी विक्रीप्रकरणी तिघे अटकेत
ठाणे : मुंब्रा भागात एमडी या नशेच्या पावडरची विक्री करणाऱ्या तिघांना ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी अटक केली असून या तिघांकडून एमडी पावडरचे एक ग्रॅम वजनाचे ३० पाऊच आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
मुंब्रा भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळून बशीर अहमद सुलतान खान (१९) आणि नावेद ऊर्फ मल्लीक अहमद फरीद अहमद अन्सारी (३१) हे दोघे नौशाद रशिद अन्सारी (३१) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ हजारांची रोकडही जप्त केली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पातलीपाडय़ात आठ लाखांची चोरी
ठाणे : घोडबंदर रोड परिसरात राहणारे व्यापारी सुनील गंगाधर मेनन (४८) यांच्या पातलीपाडा परिसरातील श्री साई या दुचाकींच्या शोरूममध्ये सोमवारी रात्री चोरटय़ांनी शिरून लोखंडी तिजोरीतून आठ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीप्रकरणी मोहनलाल पवनलाल देव (३१) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सहा बालकामगारांची सुटका
ठाणे : कल्याण येथील वायलेनगर भागातील दोन हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सहा बालमजुरांची सुटका ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने केली असून या प्रकरणी सुधीर मनोहर वायले आणि मुजूनाथ शेट्टी या दोन हॉटेलमालकांना अटक केली आहे. कल्याण वायलेनगर परिसरात सुधीर वायलेचे गावदेवी हॉटेल आहे तर शेट्टीचे साईश्रद्धा हॉटेल आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये महिना दोन हजार रुपये पगारावर ही मुले काम करीत होती. या संदर्भात माहिती मिळताच युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमालउद्दीन शेख व राजेंद्र महाले यांच्या पथकाने बालकामगारांची सुटका केली.

Story img Loader