कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात वेगवान दुचाकीला झालेल्या अपघातात बहिणीच्या मृत्यूप्रकरणी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक सिंह असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे, तर भारती सिंह असे मृत तरुणीचे नाव आहे. भारती हिचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला असला तरी रस्त्यांवरील खड्डय़ांतून वाहने चालवणे चालकांसाठी धोक्याचे बनले आहे. काहीवेळा पादचाऱ्यांच्या जिवावर बेतत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी केवळ चालकाचा हलगर्जीपणा समजून गुन्हा दाखल केला असेल तर त्याची चौकशी होणे, गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
अभिषेक याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन आदळली. या दुर्घटनेत दुचाकीवर मागे बसलेली भारती ही रस्त्यावर फेकली गेली. यात तिला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. अभिषेक याने निष्काळजीपणे वाहन चालवून बहिणीच्या मृत्यूस कारण ठरल्याबद्दल कोळसेवाडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती हवालदार दिलीप परदेशी यांनी दिली.कल्याण, डोंबिवली परिसरात गेल्या तीन ते चार वर्षांत अशा स्वरूपाचे आठ ते नऊ अपघात घडले आहेत. रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने तसेच रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. यात दुचाकी चालकांना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होते. प्रसंगी काही जण मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अपघाताबद्दल चालकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा महापालिका अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बखोटी पकडून त्यांना गजाआड करण्याची मागणी संतप्त नागरिक पोलिसांकडे काही वर्षांपासून करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा