शहरात सोनसाखळी चोरांचा उपद्रव सुरूच असताना आता महिलांना बतावणी करून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कल्याणमध्ये एका दिवसात दोन घटना घडल्या असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे महिलांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
कल्याण येथील भानुसागर टॉकीज परिसरातील लुला आर्केड इमारतीत अनिता लब्दे (६६) राहत असून त्या कल्याण पश्चिमेतील श्रीदेवी रुग्णालय परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरांनी त्यांना थांबविले आणि पुढे चौकात खून झाल्याची बतावणी केली. तसेच दागिने पिशवीत काढून ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, अनिता यांनी दागिने पिशवीत ठेवले, मात्र ते दागिने दोघांनी हातचलाखीने चोरले.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवली येथील शंखेश्वर पाममध्ये शिरीष बारखेडे यांच्या घरी केबलवाला असल्याची बतावणी करून एकाने त्यांच्या घरात प्रवेश केला. एक वायर बारखेडे यांच्या आईच्या हातात पकडण्यासाठी दिली. त्याचवेळी गळ्यातील मंगळसूत्र बाजूला काढून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची नजर चकवून त्याने ते लंपास केले.
सलूनमध्ये सोनसाखळी चोरी
ठाणे : सलूनमध्ये केस कापताना तुमचे लक्ष नसेल तर सलूनमधील कारागीर तुमचा खिसा कापू शकतो, याचा प्रत्यय देणारी घटना ठाण्यातील विटावा भागात घडली आहे. कळवा येथील विटावा परिसरातील सदगुरू अपार्टमेंटमध्ये सतीश नानाभाऊ आमले (२१) राहतात. मंगळवारी सायंकाळी ते विटावा येथील नरेश जेन्टस् पार्लरमध्ये गेले. या पार्लरमध्ये शिवा ठाकूर हा कारागीर त्यांचे केस कापत होता. त्यावेळी नजर चुकवून शिवा ठाकूरने त्याच्या गळ्यातील ५५ हजारांची सोनसाखळी चोरली. घरी आल्यानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात शिवा ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, कल्याणमध्ये सोनसाखळी चोरांचा उपद्रव सुरूच असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या घटनांमुळे सोनसाखळी चोरांच्या टोळ्यांनी धुडगूस घातला आहे.

Story img Loader