जनजागृती अभावी लाभार्थीच्या संख्येत घट
पूर्वा साडविलकर
ठाणे : जाती व्यवस्था नष्ट करून विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह करणाऱ्यांची संख्या मोठी असून ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत १० हजारांहून अधिक जोडप्यांनी या कायद्यांतर्गत विवाह केला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी ठाणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेचा मात्र तीन वर्षांत केवळ ४५५ जोडप्यांनी लाभ घेतला आहे. जनजागृती अभावामुळे अनेक जण या योजनेबाबत अनभिज्ञ असल्याने लाभार्थीची संख्या कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांची नोंद विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह करणाऱ्यांमध्ये होते. ठाणे जिल्ह्यात या कायद्यांतर्गत मागील तीन वर्षांत १० हजार ३१४ जोडप्यांनी विवाह केला आहे. अशा प्रकारे विवाह करणाऱ्यांसाठी ठाणे जिल्हा परिषदेमार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेत गेल्या तीन वर्षांत ४५५ जोडप्यांनी लाभ घेतला आहे. विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून येते. या योजनेविषयी फारशी जनजागृती करण्यात येत नसल्यामुळे ती नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या योजनेची माहिती केवळ समाजकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिबिरांमध्येच दिली जाते. त्यामुळे योजना अनेकांपर्यंत पोहोचलेली नसल्याने लाभार्थी संख्येत फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते.
योजनेचा लाभ कसा घ्यावा?
आंतरजातीय विवाहित दाम्पत्यांपैकी एक व्यक्ती मागासवर्गीय तर, एक सामान्य वर्गातील असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाह प्रमाणपत्र आणि छायाचित्रासह प्रस्ताव अर्ज जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला देणे बंधनकारक आहे. अर्ज प्राप्त होताच त्याची तपासणी करून ते मंजुरीसाठी पाठवून दिले जातात. त्यानंतर एक ते दोन महिन्यात योजनेतून ५० हजार रुपये अनुदान दाम्पत्याला मिळते.
समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शिबिरांमध्ये या योजनेची माहिती दिली जाते. ग्रामपंचायत स्तरावर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच करोनामुळे या वर्षी लाभार्थी संख्येत घट झाली आहे.
– ममता शेरे, समाजकल्याण विभाग अधिकारी, ठाणे जिल्हा.
जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी योजनांबाबत स्वतंत्र पुस्तिका काढण्याचे काम सुरू आहे. ही पुस्तिका प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पाठविण्यात येईल. जेणेकरून तेथील नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळणे शक्य होईल.
– डॉ. भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकरी, जिल्हा परिषद, ठाणे