कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयांमध्ये श्वान दंश इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती पुढे येत आहे. श्वान दंश झालेला रुग्ण या रुग्णालयांमध्ये गेल्यावर त्याच्यावर धनुर्वाताचे प्रतिबंधात्मक उपचार केले जात आहेत. आमच्याकडे श्वान दंशाचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची उत्तरे या रुग्णालयांमधील कर्तव्यावरील कर्मचारी देत असल्याच्या रुग्ण नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत श्वान दंशानंतर नागरिक रुग्णाला घेऊन पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालय किंवा डोंबिवली शास्त्रीनगर येथे धाव घेतात. या रुग्णालयांमध्ये मागील काही महिन्यांपासून श्वान दंशाच्या रुग्णावर श्वानाने केलेली जखम पाहून उपचार केले जातात. श्वानाच्या दातांमुळे जखम लहान असेल तर त्याच्यावर ॲन्टी रेबिज व्हॅक्सिनने उपचार केले जातात. याशिवाय धनुर्वाताचे इंजेक्शन दिले जाते. जखम मोठी असेल, श्वान दंशामुळे जखमेतून रक्त येत असेल तर मात्र रुग्णांना आमच्याकडे इम्युनोग्लोबीनचे इंजेक्शन उपलब्ध नाही असे कारण देऊन खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून दिला जातो, अशा तक्रारी आहेत.

सरकारी रुग्णालयांमध्ये श्वान दंशावर इंजेक्शन किंवा उपचार केले जात नाहीत. त्यामुळे कसारा, कर्जत, शहापूर, मुरबाड परिसरातील श्वान दंश झालेले रुग्ण उपचारासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयांमध्ये धाव घेतात. या रुग्णालयात केस पेपर व्यतिरिक्त इतर खर्च नसल्याने रुग्णांचा या रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ओढा असतो, असे समजते. खासगी रुग्णालयांमध्ये चढे शुल्क देऊन श्वान दंशावर उपचार करून घ्यावे लागतात. त्यामुळे नागरिक पालिका रुग्णालयांना प्रथम प्राधान्य देतात.

दोन प्रकारची इंजेक्शन रुग्णालयात श्वान दंशासाठी ठेवलेली असतात. एक इंजेक्शन दोन हजार १०० रूपये तर एक २८० रूपयांना उपलब्ध असते. रुग्णाला श्वान दंशामुळे झालेली जखम पाहून या इंजेक्शनचा वापर कर्तव्यावरील डाॅक्टर, परिचारिका करतात. श्वान दंशावर यापूर्वी पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये दर महिन्यासाठी प्रती रुग्णालय सुमारे २०० इंजेक्शन साठा म्हणून ठेवली जात असत. आता कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नाही. हा पुरवठा का होत नाही याची चाचपणी रुग्णालय वरिष्ठ करत नाही. त्याचा फटका श्वान दंश रुग्णांना पडत असल्याचे समजते. अलीकडे श्वान दंशाचे रुग्ण वाढू लागले आहेत. पालिका रुग्णालयात श्वान दंशावर उपचार होत नसले की नागरिकांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागते. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पालिका प्रशासनावर कोणाचा अंकुश आहे की असे प्रश्न संतप्त होऊन नागरिक करत आहेत.

अधिक माहितीसाठी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांना संपर्क साधला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शास्त्रीनगर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी किशोर चौधरी हे ठाणे येथे एका बैठकीत असल्याने त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.