बालकांचे प्राणघातक आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी राज्य शासनाकडून पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण करण्यात येते. त्यातही न्युमोनिया या आजारापासून संरक्षण करण्यासाठी ९ महिन्यांपर्यंतच्या बालकांना न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस (पीसीवी) देण्यात येते. परंतु गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून ठाणे जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात ही लसच उपलब्ध होत नसून यामुळे हजारो बालके या लशीपासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, राज्य शासनालाच या लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळेच राज्यासह ठाणे जिल्ह्यात या लशींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

हेही वाचा >>> ठाणे : अमली पदार्थांच्या तस्करांवर पोलिसांचा वचक ; बंद गोदाम, कारखान्यांची होणार तपासणी

राज्य शासनाकडून नुकतीच पोलिओ मोहीम राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात महापालिका तर, ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून ही मोहिम राबविण्यात आली. त्यात अनेक बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. त्याचप्रमाणे बालकांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी राज्य शासनाकडून पाच वर्षापर्यंतच्या बालकांना विविध लस मोफत देण्यात येतात. त्यात क्षय, पोलिओ, हिपेटायटिस बी, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिब-मेनिंनजायटिस आणि न्युमोनिया, गोवर आणि रुबेला, जॅपनीज एनसेफेलायटीस (जे.ई) आणि रोटाव्हायरस (अतिसार) अशा लशींचा समावेश असतो. याशिवाय, बालकांमधील न्युमोनियाचा धोका कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून ९ महिन्यांपर्यंतच्या बालकांना न्युमोकोकल काॅन्ज्युगेट लस (पीसीवी) देण्यात येते. या सर्व लशी महापालिका तसेच जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांच्या माध्यामतून बालकांना दिल्या जातात. परंतु गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात न्युमोकोकल काॅन्ज्युगेट लस उपलब्ध होत नसून यामुळे या लशीपासून बालके वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, न्युमोकोकल काॅन्ज्युगेट लस उपलब्ध होत नसून ही लस उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. परंतु राज्य शासनालाच या लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळेच राज्यासह ठाणे जिल्ह्यात या लशींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

हेही वाचा >>> डोंबिवली : कोपर रेल्वे स्थानकात ७२ पायऱ्यांचा गड ;७२ पायऱ्यांचा जिना चढताना प्रवाशांची दमछाक

ठाणे महापालिका क्षेत्रात महिन्याला दोन ते तीन हजार बालकांना न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस देण्यात येते. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात महिन्याला एक ते दिड हजार बालकांना ही लस देण्यात येते. भिवंडी, उल्हासनगर , अंबरनाथ, बदलापूरमध्येही महिन्याला हजारो बालकांना ही लस देण्यात येते. ठाणे जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महिन्याला ११ हजार बालकांना ही लस देण्यात येते. गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून ही लस उपलब्ध होत नसल्यामुळे बालकांमध्ये न्युमोनियाचा धोका वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

Story img Loader