कल्याण – मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल नीर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. रेल्वे प्रवाशांना रास्त दरात रेल्वे स्थानक, एक्सप्रेसमध्ये पाणी उपलब्ध व्हावे म्हणून रेल्वे मंत्रालयाने रेल नीरची योजना सुरू केली. गेल्या आठवड्यापासून मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे स्थानकांच्या सर्वच स्थानकांवर, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये रेल नीरचा तुटवडा जाणवू लागल्याने प्रवाशांना आता चढ्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने विक्रीसाठी अधिसूचित केलेले रेल नीर पाणी सर्व रेल्वे स्थानकांवर २५ रुपये दराने विकले जाते. प्रवासात प्रवासी या पाण्याला पसंती देतात. इतर पाण्याच्या बाटल्यांपेक्षा रेल नीरचे दर रास्त असल्याने प्रवाशांची रेल नीरला सर्वाधिक पसंती आहे. मागील आठवड्यापासून मध्य रेल्वेच्या ठाणे ते इगतपुरी, लोणावळा, हार्बर रेल्वे स्थानके, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते विरार, वापी, वलसाड, भुसावळ विभागातील नाशिक रोड ते मनमाडदरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील खाद्य पदार्थ विक्री दुकानांमध्ये रेल नीरचा साठा नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर प्रवासी पाणी कोठे मिळेल याची पहिले चौकशी करतात. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर रेल नीरचा तुटवडा जाणवू लागल्याने प्रवाशांना स्थानकाबाहेर जाऊन चढ्या दराचे पाणी विकत घ्यावे लागते.
हेही वाचा – ठाण्यातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ
प्रकल्पात दुरुस्ती
भारतीय रेल्वे खाद्यसेवा आणि पर्यटन विभागाचे सह महाव्यवस्थापक उमेश नायडू यांनी मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेच्या वस्तू सेवा पुरवठा विभागाला पत्र लिहिले आहे. कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे प्रवाशांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. त्या प्रमाणात रेल नीर उपलब्ध होत नसल्याने तुटवडा जाणवत आहे. रेल नीरच्या अंबरनाथ प्रकल्पात वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे रेल नीर उपलब्ध होण्याची शक्यता ८ मार्चपर्यंत कमी आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल नीरचा मणेरी येथील प्रकल्प लवकर कार्यान्वित केला जात आहे, असे सहमहाव्यवस्थापक नायडू यांनी कळविले आहे.
पर्यायी व्यवस्था
रेल्वे स्थानकांवर रेल नीर अभावी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेचे उप वाणीज्य व्यवस्थापक एम. एल. मीना यांनी मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना रेल नीरचा मुबलक पुरवठा होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून रेल्वेने अधिसूचित केलेले हेल्थ प्लस, रोक्को, गॅलन्स, नीमबस, ऑक्समोर अक्वा, ऑक्सी ब्ल्यू, सनरिच या नाममुद्रा असलेल्या पाण्याच्या बाटल्या विकण्यास मुभा दिली आहे.
“ रेल नीरचा कुठल्याच स्थानकांवर तुटवडा नाही. पुरेसा साठा रेल नीरचा आहे. तो मागणीप्रमाणे कपात करून स्थानकांवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना दिला जात आहे. अंबरनाथ येथील रेल नीर प्रकल्पात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने काही दिवस हा प्रश्न आहे. तो लवकरच पूर्ववत होईल. इतर नाममुद्रेच्या पाणी बाटल्या विकण्यास विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे.” असे आयआरसीटीसी मुंबईचे जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी सांगितले.