लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पावसाळा सुरु होताच, ठाणे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीत रिक्षा अडकून पडत आहेत. याचा फटका सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना बसू लागला आहे. सायंकाळच्या वेळी घरी परताना प्रवाशांना अर्धात ते पाऊण तास रिक्षाच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे स्थानक परिसराजवळ तसेच गावदेवी मंदिर आणि गावदेवी मैदाना जवळ शेअरिंग रिक्षाचे थांबे आहेत. या थांब्यावरुन शहरातील लोकमान्यनगर, यशोधन नगर, नितीन कंपनी, ज्ञानेश्वर नगर, खोपट, कॅडबरी जंक्शन, वर्तक नगर, शिवाई नगर, माजिवडा, कापूरबावडी, कासारवडवली अशा विविध भागात शेअर रिक्षा जातात. शहरात पुरेशा प्रमाणात टीएमटी बसगाड्या नसल्याने अनेकजण या शेअर रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मागील काही महिन्यांपासून या रिक्षा थांब्यावरुन प्रवाशांना लगेच रिक्षा मिळत होती. परंतू, पाऊस सुरु होताच, गेल्या एक ते दोन दिवसांपासून प्रवाशांना अर्धा ते पाऊण तासांच्या अवधीने रिक्षा उपलब्ध होत असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षा थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत, यामुळे प्रवाशी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा-कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बार, ढाबे जमीनदोस्त; महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील गुटखा विक्री टपऱ्यांना सील

गावदेवी मंदिरा जवळून लोकमान्यनगरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या शेअर रिक्षा महापालिका मुख्यालय, नितीन कंपनी, ज्ञानेश्वरनगर, कामगार नाका मार्गे वाहतूक करतात. परंतू, गेल्या काही दिवसांपासून महापालिका मुख्यालय ते नितीन कंपनी आणि नितीन कंपनी ते ज्ञानेश्वर नगर या दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तसेच शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर भागात जाणाऱ्या मार्गांवरही वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे भर पावसात या कोंडीत अडकून राहण्यापेक्षा अनेक रिक्षा चालक सायंकाळच्यावेळी रिक्षा बंद ठेवणे पसंत करत आहे. त्यामुळे स्थानक परिसरात सायंकाळच्या वेळी रिक्षाचा तुटवडा भासू लागला आहे.

परिणामी, याचा फटका प्रवाशांना बसत असून त्यांना अर्धा ते पाऊण तास रिक्षाच्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. रिक्षा मिळाल्यानंतरही या कोंडीत प्रवाशांना दहा ते पंधरा मिनीट अडकून राहवे लागत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्ती केली जात आहे. अनेक प्रवासी हे रेल्वेने प्रवास करुन आलेले असतात, त्यामुळे लवकरात लवकर रिक्षा पकडून घरी जाता यावे अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, वैयक्तिक रिक्षा केल्यास मीटर भाडे दर हे शेअरिंग रिक्षा भाडे दराच्या तुलनेत दुप्पट होत असल्यामुळे शेअरिंग रिक्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रवाशांना शेअरिंग रिक्षाच्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.

आणखी वाचा-ठाणे स्थानकाजवळ रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली, वृद्ध जखमी

रिक्षा चालकांचे म्हणणे…

पावसाळ्यात शहरात अनेक ठिकाणी कोंडी होते. या कोंडीत रिक्षा बराच वेळ अडकून राहत आहेत. त्यामुळे त्यांना रिक्षा थांब्यावर यायला वेळ लागत असून थांब्यावर प्रवाशांच्या रांगा वाढत आहे. तर, या कोंडीमुळे शेअरिंग रिक्षा चालकांना भाडे दर परवडत नसल्यामुळे अनेक रिक्षा चालक सायंकाळच्यावेळी रिक्षा बंद ठेवत आहेत.

Story img Loader