लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: श्रमिक जनता संघाचे ५७वे राष्ट्रीय अधिवेशन यंदा ठाण्यात पार पडणार आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील विविध भागातून सुमारे पाचशे कामगार कर्मचारी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ठाण्यातील थिराणी विद्यामंदिर वर्तकनगर येथील सभागृहात रविवारी, २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता हे अधिवेशन पार पडणार आहे. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्नांवर तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून एका परिसंवाद कार्यक्रमाचेही यावेळी आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि संघटनेच्या अध्यक्ष मेधा पाटकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
श्रमिक जनता संघातर्फे कामगारांच्या समस्या शासनादरबारी मांडण्यासाठी आणि त्या सर्व समस्यां सोडविण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. तर अनेकदा कामगारांच्या समस्यां सोडविण्यासाठी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन मोर्चेही काढण्यात आले आहे. श्रमिक जनता संघातर्फे दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे ५७ वे अधिवेशन ठाण्यात पार पडणार आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकारिणी सभासद यांची निवड होणार असून पुढील काळासाठी संघटनेचे कार्यपध्दतीही ठरविण्यात येणार आहे. शहरी भागातील गरीबांचे प्रश्न, विविध क्षेत्रातील असंघटित, असुरक्षित श्रमिकांचे प्रश्न, फेरीवाले -पथविक्रेता तसेच छोटे व्यवसायी यांच्या समस्या, खासगीकरण, बंद कारखान्यातील कामगारांचे प्रश्न तसेच स्थलांतरित मजूरांना न्याय, सद्य राजकीय परिस्थितीत सरकारची धोरणे आणि श्रमिक आणि श्रमिक संघटनांच्या समोरील आव्हाने याबाबत चर्चा करून ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. विविध समस्यांसोडविण्यासाठी कशा पद्धतीची कार्यपद्धती हवी याबागत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री सामंत यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली आहे.
आणखी वाचा-ठाणे: शिंदे गटाच्या तक्रारीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा
मान्यवरांचा परिसंवाद
सद्यस्थितीत कामगार संघटनांसमोरील आव्हाने आणि पर्याय या विषयावर जाहीर परिसंवादात ॲड. संजय सिंघवी, ॲड. गायत्रीसिंह, ॲड. रवींद्र नायर कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज आसरोंडकर, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे लिलेश्वर बन्सोड आणि म्युनिसिपल लेबर युनियनचे सरचिटणीस बिरपाल भाल यांच्यासह विविध संघटनांचे नेते आणि कामगार क्षैत्रातील कायदे तज्ज्ञांची भाषणे होणार आहेत. विविध कामगार व सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी आणि जागरूक नागरिकांनी या जाहीर परिसंदात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युनियनचे उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ यांनी केले आहे.