मोदक, अळुवडी आणि कोथिंबीर वडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’ हे गाणे म्हणताना श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळाविषयी आपण नेहमीच कौतुक करत असतो. मात्र श्रावण महिन्यात पावसाप्रमाणे निरनिराळ्या सणांचीही बरसात सुरू असते. या सणांनिमित्त घरात विविध खाद्यपदार्थाचीही रेलचेल असते. पातोळ्या, मोदक, अळुवडी, कोथिंबीर वडी या पदार्थाची चव चाखायची असेल तर आता गावाकडची आजी किंवा काकूकडेच जावे लागते. ठाण्यात मात्र आता असे पारंपरिक खाद्यपदार्थ काही ठिकाणी उपलब्ध होऊ लागले आहेत. भारती कोळी पोळी भाजी केंद्र त्यापैकी एक. श्रावण महिन्यात प्रत्येकाच्याच घरी महिनाभर शाकाहारी जेवणाचा बेत आखलेला असतो. एरवी मांसाहार करणाऱ्यांची त्यामुळे अडचण होते. त्यांना शाकाहारात काय खावे, असा प्रश्न पडतो. काही तरी चटपटीत आणि वेगळे खायला मिळावे, अशी त्यांची इच्छा असते. श्रावण महिन्यात इतक्या विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ उपलब्ध असतात, की त्यामुळे मांसाहाराची आठवणही होत नाही. श्रावणात घरोघरी जेवणात मोदक, अळुवडी, कोथिंबीर वडी आदी पदार्थाची रेलचेल असते. भारती कोळी यांच्या पोळी-भाजी केंद्रामध्ये हे सारे जिन्नस उपलब्ध असतात. सध्याची पिढी धावपळीत असल्याने घरी हे पदार्थ बनविण्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळ नसतो. त्यामुळे घरच्यासारखी चव असणाऱ्या केंद्रामध्ये खवय्यांची गर्दी होत असते. भारती कोळी यांच्या केंद्रात गरमागरम वाफाळलेले लुसलुशीत मोदक मिळतात. त्यांचा एक मोदक इतका मोठा असतो की, तो खाल्ल्यानंतर दुसरा मोदक खावासा वाटत असला तरीही खाऊ शकत नाही. दरदिवशी जवळपास ८० नारळांचे मोदक इथे बनविले जातात. त्यानंतर त्यात तूप आणि गूळ, वेलची पावडर टाकून अतिशय उत्कृष्ट चव तयार करतात. मोदकाच्या पाकळ्याही सुरेख असल्यामुळे हा मोदक बघितल्यानंतर खाण्याचा मोह आवरता येत नाही. विशेष म्हणजे हा त्यांचा मोदक दुसऱ्या दिवशी खाल्ल्यावरही अधिक रसाळ लागतो. मोदक बनविण्यासाठी त्यांना १५-२० किलो तांदळाच्या पिठाची उकड काढावी लागते. संकष्टीच्या दिवशी दिवसाला ५०० ते ६०० मोदकाचे नग सहज संपतात. एक मोदक १५ रुपयांना विकला जातो. त्यांच्याकडील झुणका-भाकर म्हणजे लाजवाब असते. रोज सकाळी त्या वाटल्या डाळीचा सुका झुणका बनवितात. त्यांच्याकडचा झुणका खाण्यासाठीही खवय्ये येथे लांबून लांबून येतात. लुसलुशीत तांदळाची भाकर आणि झुणका हा अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ येथे उपलब्ध आहे. मांसाहारीप्रेमी मंडळींना हा झणझणीत शाकाहार चांगलाच पसंत पडतो. त्यामुळे मांसाहारी खाणाऱ्या खवय्यांना शाकाहार करणे सहज शक्य जाते. झणझणीत पण चविष्ट झुणका बनविताना त्या घरी केलेल्या मसाल्याचाच वापर करतात. दिवसाला ३-४ किलो झुणका आणि ३-४ किलो तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या येथे अगदी सहजच संपतात.

कोथिंबीर वडी या पदार्थाचा शोधच मुळात महाराष्ट्रातला आहे. त्यामुळे गरमागरम कोथिंबीर वडी खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. एकावेळी वडय़ाचे १०-१५ चौकोनी तुकडे अगदी सहज संपतात. या वडय़ा २० रुपयाला पाच याप्रमाणे मिळतात. इतक्या खुशखुशीत आणि चविष्ट वडय़ांचे गुपित काय आहे असे विचारल्यावर भारती कोळी यांनी वडय़ांचे पीठ भिजवलेले सारण हे त्या चवीमागचे कारण असल्याचे सांगितले. भारतीताई स्वत: हे सारण तयार करतात. वर्षांनुवर्षे त्यांच्या हाताला मसाल्याच्या प्रमाणाची सवय झाल्याचेही त्या आवर्जून सांगतात. काही जण या वडय़ा घरी तळण्यासाठी घेऊन जातात. त्यामुळे गरमागरम वडय़ा घरच्यांनाही खाता येतात, असे येथे आलेले खवय्ये सांगतात. सारण भरलेल्या एक रोलची किंमत ६० रुपये अशी आहे. अळूची पाने श्रावण महिन्यात अधिक ताजी आणि छान मिळतात. अळुवडी करताना त्यात सारण भरणे हे एक कसब असल्याचे त्या सांगतात. या अळुवडय़ांच्या पानांना सारण लावून त्यांची उकड घेतली जाते. त्यानंतर त्या तळल्या जातात. मात्र काही जण अळुवडय़ा करण्यासाठी लोंढेही घेऊन जातात. दिवसाला ७-८ लोंढे अगदी सहज संपतात. हे दुकान दररोज सायंकाळी सुरू असते. सकाळच्या वेळी तयारी केली जाते. ताजे पदार्थ देण्याकडे अधिक कल असल्याने दुपारच्या वेळेतच तयारी करावी लागते. अळुवडय़ा तसे कोथिंबीर वडी जेवताना तोंडी लावण्यासाठी खाल्ल्या जातात. त्यामुळे श्रावणात या पदार्थाचा खप अधिक असतो. रात्री आठनंतर हे सर्व पदार्थ संपलेले असतात. त्यामुळे काही खवय्ये नाराज होऊन जात असल्याचेही कोळी यांनी सांगितले.

कुठे- नारायण चौक, चेंदणी कोळीवाडा, मीठबंदर रोड, ठाणे (पू.)

वेळ- सायंकाळी ६ ते १०.