ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाण्यात राम मंदिराच्या प्रतिकृतीची शनिवारी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या सेनेने देखील प्रभू रामाची राम रथ मिरवणूकीचे आयोजन केले आहे. तर सोमवारी राम मारूती रोड येथील वारकरी भवनात राम उत्सवाचे आयोजन केले आहे.
अयोध्येत सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात भाजप, शिवसेनेच्या शिंदे गटाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाजपचे माजी खासदार डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे, प्रवक्ते सुजय पतकी आणि सृजन संपदा या संस्थेच्या माध्यमातून रामायण महोत्सवाचे आयोजन गावदेवी मैदानात करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर, शनिवारी सायंकाळी शिंदे यांच्या शिवसेनेने देखील श्री कौपिनेश्वर मंदिर ते तलावपाली पर्यंत राम मंदिराच्या प्रतिकृतीची मिरवणूक आयोजित केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तलावपाली येथे महाआरती होणार आहे. तलावपाली येथील तरंगत्या रंगमंचावर विविध कार्यक्रम आयोजित असणार आहेत.
हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात आज महाआरती, राम मंदिराच्या प्रतिकृतीची मिरवणूकदेखील काढली जाणार
त्यानंतर आता ठाकरे गटाने देखील खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आणि सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवार सायंकाळी ५ वाजता प्रभू श्रीरामांचा रामरथ मिरवणूक, पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचा प्रारंभ राम मारूती रोड येथील वारकरी भवन येथून होईल. ही दिंडी श्री गजानन महाराज मंदिर, जुना मुंबई रस्ता मार्गे, घंटाळी रोड श्री साईबाबा मंदिर, घंटाळी देवी मंदिर, सामंत ब्लॉक्स, राम मारुती रोड मार्गे न्यू गर्ल्स शाळा, न्यू इंग्लिश शाळा, पु.ना. गाडगीळ, राजवंत ज्वेलर्स, तलावपाली, मराठी ग्रंथ संग्रहालय बाजारपेठ रोड, श्री कोपनेश्वर मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, जांभळी नाका येथे समारोप होणार आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वारकरी भवन येथे राम उत्सव, अभिषेक, भजन, कीर्तन आयोजित करण्यात आल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.