श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था, सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व
चाळीस वर्षांपूर्वीची डोंबिवली म्हणजे रामनगर, विष्णुनगर परिसरापुरती मर्यादित होती. या परिसराच्या अवतीभोवतीच्या भागात भातशेती, माळवरकस, ओसाड, पडीक, पाणथळ जमीन असे चित्र डोंबिवलीत होते. कोठे तुरळक ठिकाणी भूमिपुत्रांच्या चाळी. त्यात विविध भागांतून नोकरी व्यवसायानिमित्त आलेले भाडेकरू राहत. चार रस्ता (भाऊसाहेब पाटणकर चौक) भागात उभे राहिले तर एमआयडीसीपर्यंत परिसर नजरेखाली येत होता. गणेश मंदिराजवळ उभे राहिले तर ठाकुर्ली, चोळे परिसर दिसत असे.
डोंबिवली चाळीस वर्षांपूर्वी अशी मोकळीढाकळी होती. वस्ती वाढू लागली. घराच्या गरजेपोटी लोक डोंबिवलीत येऊ लागले. त्यानंतर काही नोकरदार, रहिवासी संघटित होऊन आपले हक्काचे घर या गावात असावे यासाठी प्रयत्न करू लागले. डोंबिवलीतील सारस्वत कॉलनीमधील सर्वसामान्य वर्गातील एका गटाने बापूसाहेब दातार व त्यांच्या कुटुंबीयांकडून एक भूखंड सारस्वत कॉलनीमध्ये खरेदी केला. ‘श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था’ या नावाने हा भूखंड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण ज्या ठिकाणी कायमचे वास्तव्य करुन राहणार आहोत ती वास्तू देवभूमीसारखी असावी म्हणून बेळगावचे सद्गुरू विवेकानंद काणे महाराज यांचे नाव नोंदणीकृत संस्थेला देण्यात आले. सद्गुरुंचे सतत स्मरण व्हावे, हाही या नावामागील उद्देश आहे.
श्री विवेकानंद सोसायटी गावाच्या वेशीवर होती. पण वाढती वस्ती आणि नागरीकरणामुळे ही वसाहत आता गावाच्या मध्यभागी आली आहे. ही वसाहत विकसित करताना गृहनिर्माण संस्था सदस्यांनी आपण सगळी नोकरदार मंडळी आहोत. प्रत्येकाला आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे हक्काचे घर मिळेल, अशा पद्धतीने या भूखंडावर इमारती बांधू असा निर्णय घेतला. पगारातून मिळणारी मिळकत आणि आयुष्याच्या पुंजीतून या सोसायटीत प्रत्येक सदस्य, रहिवासी घर घेणार असल्याने याठिकाणी कोणताही काळा व्यवहार राहणार नाही याची काटेकोर काळजी सदस्यांनी घेतली. १९७१ च्या दरम्यान डॉ. घोटीकर हे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सदस्यांनी आयुष्यभर डोक्यावर राहणारे छत भक्कम असले पाहिजे म्हणून इमारतीचे बांधकाम पक्के झाले पाहिजे. या बांधकामात कोठेही कोणत्याही प्रकारची त्रुटी असता कामा नयेत. सतत इमारत डागडुजीसाठी खर्च करावा लागू नये म्हणून भक्कम पद्धतीचे काम झाले पाहिजे, असा निर्णय सदस्यांनी घेतला. बांधकामाची सगळी कामे दर्जेदार झाली पाहिजेत म्हणून बांधकाम क्षेत्रातील आघाडीचे नाख्ये उद्योग समूहातील मे. अजय कन्स्ट्रक्शन यांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तुविशारद म्हणून आर. व्ही. दातार, आरसीसी कन्सल्टन्ट भिरूड यांची नेमणूक करण्यात आली. सामान्य कुटुंबातील लोक एकत्र येऊन आपली हक्काची घरे बांधतात म्हणून या बांधकामात कोठेही कोणत्याही प्रकारची त्रुटी येणार नाही याची काळजी मामूशेठ नाख्ये यांनी घेतली. अतिशय आखीव-रेखीव पद्धतीने या बांधकामाचे आराखडे तयार करण्यात आले. नगरपालिका, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए व अत्यावश्यक सर्व परवानग्या घेऊन इमारतींची बांधकामे सुरू झाली.
दातार कुटुंबीयांकडून जमीन खरेदी करतानाच सातबारा उतारा श्री विवेकानंद सोसायटीच्या नावावर झाला असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण सदस्यांना आली नाही. सोसायटी नोंदणीकृत आहे. अतिशय स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने जमीन खरेदी, इमारत उभारणी आणि सोसायटीतील सदनिका विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यात आले आहेत. सातबारा सोसायटीच्या नावावर असल्यामुळे ‘मानीव अभिहस्तांतरणा’ची (कन्व्हेन्स डीड) सोसायटीला गरज नाही.
१३ सप्टेंबर १९७१ मध्ये श्री विवेकानंद सोसायटी नोंदणीकृत झाली. दरम्यानच्या काळात १९८६ पर्यंत तीन माळ्यांच्या १७ इमारती आखीव-रेखीव पद्धतीने सोसायटीच्या जमिनीवर उभारण्यात आल्या. यामध्ये एक इमारत वाणिज्य स्वरूपाची आहे. सोसायटीत ४०० सदनिका आहेत. सुमारे १६०० रहिवासी एक गाव म्हणून सोसायटीत राहत आहेत.
अतिशय आखीव-रेखीव पद्धतीने इमारती उभारून शहराच्या विकासाची रचना कशी असावी, याचे प्रारूप विवेकानंद सोसायटीत पाहण्यास मिळते. १७ इमारती उभारताना प्रत्येक इमारतीमधील कुटुंबाला मोकळी हवा, झाडांची सावली, वाहने ठेवण्यासाठी जागा, मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान असेल, पाणी मुरण्यासाठी माती राहील, अशा ऐसपैस पद्धतीने इमारतींची उभारणी आणि सोसायटीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
१७ इमारतींमधील प्रत्येक इमारतीच्या मध्यभागी आणखी एक भव्य इमारत उभी राहील, अशा प्रकारचा मोकळा भाग येथे आहे. या सोसायटीतील प्रत्येक सदस्य, कुटुंबाची एकमेकांशी जुळलेली घट्ट नाळ, परस्परांवरचा दृढ विश्वास, सोसायटी कार्यकारिणीची प्रत्येक पदाधिकारी, कार्यकारिणीचा एकमेकांवरील विश्वास ही विश्वासाची अखंड साखळी ४५ वर्षांपासून सोसायटीला प्रगतिपथावर नेत आहे. विद्यमान कार्यकारिणीतील अध्यक्ष विजय पंडितराव, सचिव रमेश खुजे, सहसचिव सुमेधा बांदेकर, खजिनदार लक्ष्मीकांत भोसले आणि कार्यकारिणी सदस्य किती काटेकोरपणे काम पाहत आहेत याची कल्पना या वसाहतीमधील एकंदर कारभार पाहून लक्षात येते.
डोंबिवलीत एखाद्याला माती हवी असेल तर ती शोधावी लागते. संपूर्ण डोंबिवलीत सीमेंट काँक्रीटचे जंगल उभे राहिले आहे. कॉपरेरेट संस्कृतीमुळे इमारतीच्या आवारातील माती काढून त्यावर नगरसेवक, आमदारांच्या कृपेने पेव्हर ब्लॉक, लाद्या बसविण्याची फॅशन आली आहे. विवेकानंद वसाहत या बदलत्या ट्रेण्डपासून अलिप्त आहे. सोसायटीच्या अंतर्गत आणि चहुबाजूंनी मातीच माती आहे. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रत्येक सोसायटीकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता आणि त्याला उपपायावाटा अशी रचना सोसायटीत आहे. मातीमुळे गवत, हरावळ (दुर्वा) यांचे झुबके जागोजागी पाहण्यास मिळते. सोसायटीच्या मध्यभागी, चहुबाजुंनी विविध प्रकारची फळ, फुलांची झाडे आहेत. या बारमाही हिरवाईमुळे विविध प्रकारचे पक्षी येथे पाहण्यास मिळतात.
सोसायटीच्या मध्यभागी ‘नाग गणेश’ देखणे मंदिर आहे. (इमारतींची बांधकामे सुरू असताना जमिनीत नागाची मूर्ती सापडली होती) मंदिर सभामंडपात सकाळ, संध्याकाळच्या वेळेत सोसायटीतील आजी, आजोबा, नातवंडे या ठिकाणी निवांतपणासाठी येतात. सोसायटीचा परिसर अवाढव्य असल्याने कोणा सदस्याला शतपावलीसाठी बाहेर जावे लागत नाहीत. १७ इमारतींना पालिकेचा पाणीपुरवठा, मल:निस्सारण वाहिन्या जोडण्यांची व्यवस्था आहे. आवारातील गटार बंदिस्त करण्यात आले आहे. बाजूचा जलाराम नाला उंच भिंती बांधून दोन्ही बाजूने बंदिस्त करण्यात आला आहे. त्यात पालिकेवर अवलंबून न राहता सोसायटीत नियमित झाडलोट, कीटकनाशक फवारणी उपक्रम केले जातात. त्यामुळे सोसायटीत सदैव स्वच्छता असते.
सोसायटीत राष्ट्रीय कार्यक्रमांबरोबर गणेशोत्सव, गजानन महाराज प्रकट दिन व इतर धार्मिक कार्यक्रम साजरे केला जातात. सोसायटी सभागृहात योग वर्ग, संस्कार शिबीर घेतली जातात. सोसायटीतील उपक्रम पार पाडण्यासाठी विवेकानंद उत्कर्ष मंडळ, वधिनी महिला मंडळ, स्वामिनी भजनी मंडळ, मंगळागौर मंडळ, मंदिर अशा समित्यांमधून सोसायटीतील उत्सव पार पाडले जातात. सोसायटीतील मुलामुलींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसविले जातात. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
‘संहति कार्यसाधिका’ या तत्त्वाने सोसायटीचा कारभार सुरू आहे. दर पाच वर्षांनी लोकशाही पद्धतीने सोसायटी कार्यकारिणीची निवड केली जाते. संस्थेचा आर्थिक लेखाजोखा दरवर्षी सदस्यांना उपलब्ध करून दिला जातो. लेखापरीक्षणात पहिल्या दिवसापासून सोसायटी ‘अ’ दर्जा प्राप्त करते. लेखाजोखा अहवालावर दर वर्षी एक सामाजिक संदेश दिला जातो आणि वर्षांतील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम घटनेला अहवाल समर्पित केला जातो. चाळीस र्वष उलटून गेली तरी सोसायटीच्या इमारती सर्वोत्तम असल्याचे, अहवाल संरचनात्मक अभियंत्यांनी दिले आहेत. असे हे विवेकानंद सोसायटीमधील गोकुळ ‘आम्ही नांदतो येथे सुखात’ असे म्हणत सुख-समाधानाने वास्तव्य करीत आहे. गगनचुंबी संकुल ही भुरळ असली तरी आताच्या वातावरणासारखे कौटुंबिक वातावरण त्या ठिकाणी अनुभवण्यास मिळणार नाही. सोसायटीत एकदा व्यापारीही शिरले की माणुसकी मागे पडते. आहे त्या ठिकाणी प्रत्येक जण सुखी आहे. त्यामुळे तात्काळ सोसायटीचा पुनर्विकास करण्याचा विचार नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात सोसायटीच्या आवारात पालिकेच्या सहकार्याने कचरा विल्हेवाट प्रकल्प राबिवणे, पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलसंचय योजना राबविणे, वाहनतळ, सौर ऊर्जा प्रकल्प, सोसायटी परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा सदस्यांचा प्रयत्न आहे.
पाणी बचतीसाठी पुढाकार
आता पाणी बचत, विहिरी स्वच्छ ठेवा म्हणून शासन संदेश देत असले तरी त्याची आगाऊ तजवीज विवेकानंद सोसायटीने केली आहे. सोसायटीच्या आवारात चाळीस वर्षांपासून एक विहीर आहे. विहिरीचे पाणी स्वच्छ राहील म्हणून ती दरवर्षी साफ केली जाते. विहिरीत गप्पी मासे, कासव सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी शुद्ध राहते. विहिरीतील पाण्याचा नळ प्रत्येक घरात देण्यात आला आहे. पालिकेकडून येणारे पाणी, विहिरीतील पाणी याचा योग्य मेळ घालून पाण्याचा योग्य वापर होईल, अशी काळजी घेतली जाते. तळाच्या पाणी टाक्या वर्षांतून दोन वेळा साफ केल्या जातात. १७ इमारतींमधील कचरा, झाडलोट नियमित केली जाते. सोसायटीचे विस्तारित भौगोलिक क्षेत्र विचारात घेऊन पाच सुरक्षारक्षक सोसायटीच रात्रंदिवस संरक्षण करतात. सोसायटीमधील सर्व मालमत्तांचा विमा उतरविण्यात येऊन मालमत्तेला आर्थिक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. रात्री बारा वाजल्यानंतर सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येते.