ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचे बोलले जात असतानाचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अखेरच्या यादीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजेश मोरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले असून ” कल्याण ग्रामीणचा निर्णय हा पक्षातील वरिष्ठांनी घेतला असून आम्ही केवळ पक्षाचे काम करत आहोत. तर लोकसभा निवडणुकीवेळी मनसेसमवेत युती होती मात्र आता ती नाही, यामुळे राजेश मोरे यांना उमेदवारी दिली ”  असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री पुत्र डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा देखील होती. तर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसेचे राजू पाटील आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. खासदार डॉ.शिंदे यांना मिळालेल्या सुमारे १ लाखांहून अधिकच्या मताधिक्यात राजू पाटील यांचा देखील मोलाचा वाटा होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी याची परतफेड म्हणून जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून  विशेषतः शिवसेनेकडून मनसेला साथ दिली जाईल असे बोलले जात होते. मात्र मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांच्या विरोधात कल्याण ग्रामीण  विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजेश मोरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यामुळे एकीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून सुभाष भोईर आणि शिंदे गटाकडून राजेश मोरे या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांचा राजू पाटील यांना निवडणुकीत सामना करावा लागणार आहे. तर याबाबत खासदार डॉ.शिंदे यांनी आपली भूमिका नुकतीच स्पष्ट केली आहे. कल्याण ग्रामीणचा निर्णय हा पक्षातील वरिष्ठांनी घेतला असून आम्ही केवळ पक्षाचे काम करत आहोत. तर लोकसभा निवडणुकीवेळी मनसेसमवेत युती होती मात्र आता ती नाही यामुळे राजेश मोरे यांना उमेदवारी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याण ग्रामीण मध्ये राजेश मोरे यांचे चांगले काम आहे. भारतीय जनता पक्षाचे काम देखील चांगले आहे यामुळे ही जागा लढवत आहोत. तर जिल्ह्यातील शिवसेनेच्या आणि महायुतीतील इतर पक्षांच्या सर्व जागा बहुमताने निवडणून येतील यासाठी सर्व कार्यकर्ते काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>डोंबिवली : फडके छेद रस्त्यावरील आगरकर काँक्रीट रस्त्याच्या संथगती कामामुळे वाहन कोंडी

इच्छुकांना पक्ष नाराज करणार नाही – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

कल्याण पश्चिम येथून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र  पक्षाकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा संधी देण्यात आली. यामुळे रवी पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते. तर सुमारे एक दिवस रवी पाटील नॉट रिचेबल देखील झाले होते. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी रात्री विश्वनाथ भोईर यांच्यासह रवी पाटील आणि इतर स्थानिक शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रत्येक कार्यकर्त्याची – पदाधिकाऱ्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा असते. मात्र उमेदवारीबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. मात्र पक्षासाठी काम करणाऱ्या आणि इच्छुक असलेल्या शिवसैनिकांना पक्ष नाराज करणार नाही त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही खासदार डॉ.शिंदे यांनी स्पष्ट केले.