ज्यांच्याकडे नेतृत्व आणि सत्ता असते ते काहीही करू शकतात, असे म्हटले जात असले तरी कल्याण पूर्व परिसर या वाक्याला अपवाद आहे. कारण कल्याण-डोंबिवली शहरांच्या नेतृत्वाची धुरा गेल्या साडेसात वर्षांपासून कल्याण पूर्वेकडील लोकप्रतिनिधींच्या हाती असून केवळ महापौर नव्हे, तर विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते अशी महत्त्वाची पदेही कल्याण पूर्वेतील नगसेवकांनी भूषवली, मात्र या भागांतील विकासाच्या दृष्टीने हा परिसर दुर्लक्षित टापू म्हणावा असाच आहे.
कल्याण पूर्वेचा परिसर ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये येत असून विकासापासून हा परिसर अनेक वर्षांपासून वंचित अवस्थेत आहे. कल्याण पश्चिमेला थेट जोडेल असा जवळचा रस्ता नाही, चालण्यासाठी स्कॉयवॉक नाहीत, आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत, झोपडपट्टी विकासाच्या दृष्टीने धोरण नाही, गटारे पायवाटा आणि रस्तेही अरुंद, उद्याने, मैदाने, भाजी मंडई, मच्छीमार्केट अशा सेवा-सुविधा मुळीच नाहीत.. स्वच्छतेसाठी कचराकुंडय़ा नाहीत, पार्किंगसाठी जागा नाहीत, फेरीवाल्यांचा उपद्रव, जलवाहिन्यांमधून येणारे पाणीही अपुरे, शिवाय वाहतुकीसाठी परिवहनची गाडीसुद्धा नाही.. अशा अनेक समस्यांनी हा भाग व्यापलेला असून विकासाच्या प्रवाहापासून कैक मैल दुरावलेला असल्याची स्थिती कल्याण पूर्वेतील भागांमध्ये आढळून येते. दुर्लक्षिततेच्या कोंदणामध्ये गेली कैक वर्षे हा भाग अडकून पडला असून या भागातील राजकीय नेतृत्वाला सत्तेची महत्त्वाची पदे उपभोगत असताना या परिसराकडे लक्ष देण्यास मात्र वेळ मिळाला नाही.
समस्यांचा पाढा
या परिसरामध्ये प्रामुख्याने कोळसेवाडी, आनंदवाडी, तिसगाव, विजयनगर, चिंचपाडा, हनुमाननगर, मंगल राघोनगर हा परिसर येत असून या परिसराच्या विकासासाठी कित्तेक वर्षे कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होत नसल्याने रस्ते, पाणी या सुविधांशिवाय महापालिकेची एकही सुविधा या भागात पोहोचू शकलेली नाही. मैदाने, उद्याने, भाजी मंडईसाठी आरक्षित जागांवर अतिक्रमणे पूर्ण झाली असून त्यांच्या बचावसाठी महापालिकेने कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. शहर सुटसुटीत आणि नियोजित राहावे अशी महापालिकेची जबाबदारी असली तरी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांचे पेव या भागात फुटलेले दिसून येते. आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या गीता हरकिसनदास रुग्णालयाच्या जागेवर मॉल बांधण्याची संकल्पना येथील शहराचे प्रमुख पद भूषवणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या डोक्यात आली होती. मात्र नागरिकांनी केलेल्या विरोधानंतर गीता हरकिसनदास रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. हे रुग्णालय पूर्ण झाले असले तरी त्याच्यामध्ये डॉक्टर नसल्याने हे रुग्णालय केवळ प्रथमोपचार केंद्र बनले आहे.
वाहतूक सुविधेच्या नावाने बोंब
कल्याण पूर्वेतील स्कायवॉक गेल्या आठ वर्षांपासून बांधण्याचे काम केले जात असले तरी ते अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. स्कायवॉकच्या बांधकामामध्येच अनेक त्रुटी सतत येऊ लागल्या. कल्याण पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी थेट व्यवस्था नाही. पत्री पूल आणि नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल आणि रेल्वे फाटक अशा मार्गाचा लाभ घेणे म्हणजे तीन ते चार किमी.चा वळसा घालण्याचा प्रकार आहे. कल्याण पूर्वेत रिक्षाशिवाय अन्य वाहन धावत नाही. या भागात परिवहनची बस सुरू केल्यानंतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी प्रशासनाला धारेवर धरून रिक्षा व्यावसायिकांसमोर स्पर्धा नको म्हणून त्या बंद करण्यास भाग पाडत असल्याचा अजब प्रकार येथे पाहायला मिळतो.

Story img Loader